शिरूर । समोरचा उमेदवार कोणीही असो जो उमेदवार असेल त्याच्याविरूध्द लोकसभेची निवडणूक लढविणार आहे. केवळ सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामुळेच मी खासदारकीची हॅट्ट्रीक केली असून चौथ्यांदा शिरूर लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. शिरूर शहर व तालुक्यातील गावभेट दौर्यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार आढळराव पाटील बोलत होते. शिरूर पोस्ट ऑफिस येथे आधारकार्ड नोंदणी व दुरूस्ती केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
सुप्रिया सुळेंपेक्षा जास्त निधी देणार
खासदार सुप्रिया सुळे शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवून जास्त निधी देणार असल्याचे सांगत असतील तर मी बारामतीतून निवडणूक लढवून खासदार सुळे यांच्यापेक्षा शंभर रूपये जास्त निधी देऊन बारामतीचा विकास करून दाखवेन, असेही खासदार आढळराव पाटील म्हणाले. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले असल्याने विरोधक कोणीही असो त्याचा विचार मी करत नाही. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मी काम करत नाही, तर सत्तेत असूनही शेतमालाला बाजारभाव मिळण्यासाठी तसेच शेतकर्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी व विविध समस्यांविषयी वेळोवेळी आंदेलनात सहभाग घेऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पोस्ट ऑफिस पुणे ग्रामीणचे अधीक्षक के. आर. कोरडे, जयश्री पलांडे, अनिल काशिद, नगरसेवक संजय देशमुख, अंजली थोरात, विजया टेमगिरे, मयुर थोरात, किरण देशमुख, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.