उमेदवार निश्चितीचा अधिकार मोदींना देण्यास शिवसेनेचा विरोध

0

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तर्फे राष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण असावा, हे ठरविण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दर्शविला आहे, अशी माहिती ‘मातोश्री‘सूत्राने दिली. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली व त्यांच्याशी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही या बैठकीला उपस्थिती होती. ठाकरे यांच्या या निर्णयाने राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत सर्वसहमती करण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला खीळ बसली आहे.

राष्ट्रपतिपदाचा उमेदवार एनडीए ठरवेल : ठाकरे
राष्ट्रपती निवडणूक व एनडीएचा उमेदवार कोण असावा, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मातोश्री गाठले. तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. ठाकरे यांच्याशी तब्बल सव्वातांस चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. प्रारंभीच्या चर्चेत प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती. मात्र, निघताना ठाकरे यांनी शहा यांना एकांतात बोलावून हितगुज केल्याने व त्यावेळी खा. दानवे यांना बाहेर ठेवल्याने एकच चर्चा सुरु झाली होती. या बैठकीत शहा यांनी ठाकरे यांना सांगितले की, राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचे ठरविण्यात आले आहे. या निर्णयास शिवसेनेनेदेखील पाठिंबा द्यावा. परंतु, ठाकरे यांनी शहा यांना याबाबत पूर्णतः नापसंती दर्शविली. तसेच, उमेदवार हा सर्वसहमतीने ठरविण्यात यावा, असे सूचवले. राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत किंवा ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नावासाठी शिवसेनेने उघडपणे आग्रह धरला आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील आणखी एका नावासाठी शिवसेनेचा आग्रह असून, त्याबाबत मात्र सेनानेतृत्वाने जाहीर वाच्यता टाळली आहे.

.. अन् शहा खाली हात परतले!
शिवसेनेने अन्य नावांची शिफारस करण्यापेक्षा एनडीएची शिस्त पाळून मोदी ठरवतील त्या नावालाच पाठिंबा द्यावा, असा आग्रह या बैठकीत अमित शहा यांनी धरला होता. तथापि, शहा यांची ही मागणी ठाकरे यांनी फेटाळून लावली. उद्धव यांनी स्पष्ट केले, की भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे. त्यानंतर या नावाला पाठिंबा द्यावा किंवा नाही, याचा निर्णय शिवसेना स्वतंत्रपणे घेईल. शिवसेनेतर्फे दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्याबाबत भाजपने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचनाही ठाकरे यांनी यावेळी केली. या दोन नावाव्यतिरिक्त एखादे नाव निश्चित करायचे असेल तर ते नाव एनडीएतील घटकपक्ष सर्वसहमतीने निश्चित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे अधिकार नसावेत, अशी स्पष्ट सूचनादेखील ठाकरे यांनी या बैठकीत केली. त्यामुळे शहा यांच्या या बहुचर्चित बैठकीत भाजपच्या हाती काहीही लागले नसून, ते खाली हात परतल्याची भावना भाजपनेतृत्वात निर्माण झाली होती.