उमेश यादव, मोहम्मद शमी संघात परतले

0

मुंबई । उमेश यादव आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांच्या जोडीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात पुनरागमन केले आहे. बीसीसीआयच्या रोटेशन पद्धतीनुसार निवडसमितीने 17 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या या मालिकेतील पहिल्या तिन सामन्यांसाठी रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्‍विनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात एकच बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघातून वगळण्यात आले आहे. उमेश आणि शमीला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले की, युजवेंद्र चहल आणि अक्शर पटेलला श्रीलंकेविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे पुन्हा संधी देण्यात आली आहे. भारताने लंका दौर्‍यात तिन्ही प्रारुपांतील सामने जिंकले आहेत. प्रसाद म्हणाले की, बीसीसीआयच्या निवड पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी संघ निवडण्यात आला आहे. त्यात आर. अश्‍विन आणि रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या दौर्‍यात संघाने चांगली कामगिरी केली होती. आपली छाप पाडणार्‍या युजवेंद्र चहल आणि अक्शर पटेलला आणखी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची बेंच स्ट्रेंथ मजबुत करण्यासाठी मदत होईल.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, अक्शर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वरकुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.