उरणमध्ये नाले साफ पण रस्त्यांवरच कचर्‍याचा ताप

0

उरण । उरण शहरातील नालेसफाईची कामे यावर्षी उरण नगरपरिषदेने कुणा ठेकेदाराला न देता ती स्वतः केली आहेत. यानिमित्ताने शहरातील बहुतांशी नाली चागल्या प्रकारे साफ झाली आहेत. मात्र, नाले साफ करून त्यातून काढल्या गेलेल्या घाणीचा मात्र भलताच ताप झाला आहे. कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तर ही रस्तोरस्ती काढून ठेवलेली घाण पुन्हा नाल्यामध्ये जाऊ लागली असल्याने नगर परिषदेची साफ सफाई मात्र मुसळात गेल्याचा टोला नागरिकांकडून लागण्यात येत आहे. याबाबत नगर परिषदेचे मुख्य अभियंता अनुपकुमार कांबळे यांना विचारले असता त्यांनी या आरोपात तथ्यता असल्याचे मान्य करताना शहरात बर्‍याच ठिकाणी अशी घाण पडून असून ती उचलण्याचे आदेश आपण आरोग्य विभागाला कालच दिले असल्याचे सांगितले त्याच प्रमाणे एम एस ई बी ने शहरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे तोडली आहेत ती घाणदेखील आम्हालाच उचलावी लागत असल्याचा संताप यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

जोरात हाक मारली तर या टोकापासून त्या टोकापर्यंत ऐकू जाईल एवढ्या छोट्या आकाराच्या उरण शहरातील समस्या काही सुटण्याचे नाव घेत नाही. कोट्यवधी रुपये खर्चून शहरात केले जात असलेले रस्त्याचे काँक्रिटीकरण तर शहरवासीयांना रोजच्या होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे नको झाले आहे. त्यातच यानिमित्ताने खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या कडेला कोणताही अडथळा कलेला नसल्याने या पावसाळ्यात अंदाज न आल्यास एखादं दुसरा उरणकर खड्यात जाण्याचा धोका आहे. आनंद नगर सारख्या विभागात पाण्याची रोजचीच मारामार असल्याची तक्रार त्या विभागात राहणारे शिक्षक एस एस पाटील यांनी बोलताना व्यक्त केली आहे या सर्व पार्श्‍वभूमीवर शहरात पावसाळ्याच्या निमित्ताने यावर्षी नगर परिषदेच्या वतीने स्वतः कामगार घेऊन नाल्यांची साफसफाई घेण्यात आली होती. ती बर्‍यापैकी पूर्ण ही झाली आहे. मात्र, त्या निमित्ताने नाल्यातून काढण्यात आलेली घाण मात्र आजतागायत उचळण्यातच आलेली नसल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. नगर परिषदेच्या कार्यालयाच्या प्रवेश द्वारापाशी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोर अशा प्रकारची घाण असल्याचे दिसून आले आहे, कामठा रोडवर सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागील बाजूस ही अशाच प्रकारे घाण रस्त्यावर असल्याचे दिसून आले आहे.द्रोणागिरी बाजारासमोर असलेल्या पांडुरंग जे.पाटील यांच्या बंगल्याच्या समोर ही अशाच प्रकारे घाण रस्त्यावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही घाण मुसळधार पावसात पुन्हा शहरातील नाल्यात जाऊन नाले तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.नगर परिषदेच्या मुख्य अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी अशी घाण असल्याचे मान्य केले असून ती लवकरच उचलण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.