उरण तालुक्यात माती उत्खनन करण्याच्या प्रकारांना पेव फुटले

0

उरण । उरण तालुक्याचे महसूल खात्याचे सर्व अधिकारी गाढ झोपेत असतानाच उरणच्या पूर्व भागात केवळ रात्रीच्या वेळीच माती उत्खनन करण्याच्या प्रकारांचे पेव फुटले आहे. येथील पिरकोन पासून आवरे गावापर्यंत अनेक ठिकाणी डोंगराना या कंत्राटदाररुपी घुशी लागल्याचे चित्र दिसत आहे. या उत्खननाचे फोटो काढायला जाणार्‍या पत्रकार मंडळींना देखील कंत्राट दाराची माणसे मज्जाव करत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे उत्खनन सुरू आहे याची सुतराम माहिती त्यांना नसल्याचेदेखील यानिमित्ताने समोर आले आहे. कोप्रोली विभागाचे मंडळ अधिकारी मोहिते यांना याबाबत विचारले असता रात्रीच्या वेळी उत्खनन होत असल्यास त्याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे बोलताना सांगितले तर काही लोकांनी उत्खननाचे परवानगी घेऊन तशी रॉयल्टीदेखील भरली आहे. मात्र, हे रात्रीच्या वेळी उत्खनन होत असेल तर त्यात काही तरी चोरी असावी अशी शंका ही मोहिते यांनी व्यक्त केली आहे. उरण तालुका परिसरात सुरू असलेली विविध विकासाची कामे पाहता या ठिकाणी पुरेशा प्रमाणात मातीची उपलब्धताच नाही.

माती उत्खनन रात्री सर्वाधिक
सध्या या ठिकाणी वनखाते, सरकारी परीघ, गुराचारण अशा जमिनीमध्ये माती उपलब्ध आहे तर अवघ्या काही प्रमाणात खासगी डोंगर शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मातीचोर खासगी जमिनीतून माती काढणीची परवानगी मिळवून हळूच बाजूच्या वन जमिनी, सरकारी जमिनी किंवा गुरचरणाच्या जमिनीवरही ताव मारुन माती काढून नेत असतात . भोम परिसरात अशाच प्रकारे वन जमिनीत झालेल्या उत्खननावर वन अधिकारी वर्गाने मागील वर्षी कारवाई केली होती. या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा एकदा मातीच्या शोधात असलेले ठेकेदार पिरकोन ते आवरे या भागातून काही खासगी जमिनीतून माती उत्खनन करत आहेत. मात्र, असे करताना त्यांनी उत्खननसाठी रात्रीची वेळ निवडली असल्याने अनेक शंका-कुशंका या ठिकाणी व्यक्त होताहेत. जेवढ्या मातीची रॉयल्टी भरलीय त्यापेक्षा जास्त उत्खनन तर होत नाही ना? खासगी जमिनींना लागून असलेल्या वनखात्याच्या जमिनीत तर कंत्रातदारांचे पोकलन चुकून घुसले नाहीत ना? अशी माती वाहून नेताना घ्यावयाची सर्व काळजी घेतली जात आहे ना? अशा अनेक शंका यानिमित्ताने घेतल्या जात असून, असे माती उत्खनन रात्रीच्या वेळेस सर्वाधिक चालत असल्याने यातून माती चोरी तर होत नाही ना असा सर्वात मोठा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.