आयनॉक्स थिएटरमध्ये घेतला एकत्रितपणे चित्रपटाचा आनंद
दैनंदिन तणावमुक्तीसाठी पोलीस अधीक्षकांचा उपक्रम
जळगाव- पोलीस म्हटल नेहमीच 24 तास अलर्ट…मग अधिकारी असो की कर्मचारी दिवसभर काम, तपास, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतूक सुरक्षेत व्यस्त.. अशाच दैनंदिन जीवनशैलीत व्यस्त 317 पोलीस अधिकारी कर्मचार्यांनी शुक्रवारी चक्क आयनॉक्स सिनेमागृहात ‘उरी: ’द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपटाचा आनंद घेतला. निमित्त होते ते पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित प्रजासत्ताकदिनानिमित्त खास शो चे… चित्रपटानंतर प्रत्येक पोलीस कर्मचारी, अधिकार्याच्या चेहर्यावर वर्षात कधी नव्हे, एवढा आनंद तर ओसंडून वाहत होताच..त्याशिवाय उपक्रमांबद्दल प्रत्येकाच्या तोंडून पोलीस अधीक्षकांसाठी थँक्यू सो मच सर.. हे शब्द निघाले होते…
सदरक्षणाय खल निग्रहणाय हे पोलिसांचे ब्रीद वाक्य…नागरिकांच्या सुरक्षेची शपथ तसेच गुन्ह्याचा तपास यात 12 महिने 12 दिवस 24 तास पोलीस कर्तव्य बजावत असतात. यातून तणावमुक्त होवून अधिकारी,कर्मचार्याचे मनोरंजन व्हावे, त्याला आनंद मिळावा या या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उरी: ’द सर्जिकल स्ट्राईक’ या हिंदी चित्रपटाच्या शोचे कर्मचार्यांसाठी आयोजन केले होते. सहकार्यासोबत चित्रपट पाहण्याचा योग क्वचितच येतो. मात्र शुक्रवारी साध्या गणवेशात उपस्थित असलेल्या 317 पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांनी एकत्रितपणे चित्रपटाचा आनंद घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांचीही उपस्थित होती.
काय आहे चित्रपटात
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. बॉक्स ऑफीसवर ‘उरी’ला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जम्मू- काश्मीरमधील उरी मधील लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.
कोट-
देशभक्तीपर असलेला चित्रपट आपल्या अधिकारी आणि कर्मचार्यांना दाखवण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे हा उरी चित्रपट देशभक्तीपर असल्याने चित्रपटाच्या माध्यमातून पोलीस कर्मचार्यांपर्यंत चांगला संदेश पोहचावा या उद्देशाने शोचे आयोजन केले होते. पोलिसांना आपल्या सहकार्यांबरोबर चित्रपट पाहण्याचा योग क्वचितच येतो. आज मात्र आज सर्वांनी मिळून एकत्रितपणे चित्रपटाचा आनंद घेतला- दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक