उर्जा मंत्र्यांचा दीपनगरात भाजपा पदाधिकार्‍यांना गुंगारा

आंदोलनापूर्वीच मंत्री दुसर्‍या रस्त्याने भुसावळकडे रवाना : मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

भुसावळ : उर्जा मंत्री नितीन राऊत यांना विविध समस्यांचे निवेदन देण्यासाठी भाजपा पदाधिकारी दीपनगरात 500 प्रकल्पाच्या गेटवर ठिय्या मांडून होते मात्र आता येतील, तेव्हा येतील म्हणत भाजपा पदाधिकारी मंत्र्यांची वाट पाहत राहिले मात्र मंत्री राऊत हे 210 प्रकल्पाच्या गेटवरून थेट भुसावळात निघून गेल्याने भाजपा पदाधिकार्‍यांचे आंदोलन टळल्याने पदाधिकार्‍यांनी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या धसक्याने मंत्र्यांनी पळ काढल्याचा दावा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी केला.

आंदोलनापूर्वीच मंत्र्यांचा गुंगारा
भारतीय जनता पार्टी वरणगावतर्फे शुक्रवारी दीपनगर येथे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना वरणगाव शहरातील पिण्याच्या पाण्यासह खंडित विजेबद्दल तसेच वरणगावात भारनियमन करू नये तसेच कठोर येथे एक्स्प्रेस फिडर मंजूर करण्यासह सीएसआर निधी देण्यात यावा, वरणगाव शहर व परिसरातील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासह घोटाळ्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपा पदाधिकारी निवेदन देणार होते. ठरल्याप्रमाणे मंत्र्यांना निरोपही पाठवण्यात आला मात्र मंत्री महोदय 500 मेगावॅटच्या प्रवेशद्वारातून बाहेर जाताना निवेदन स्वीकारतील, असा निरोप पाठवण्यात आल्याने पदाधिकारी थांबून होते मात्र मंत्री महोदय 210 मेगावॅटच्या गेटद्वारे सरळ भुसावळकडे निघून गेल्याने भाजपा पदाधिकार्‍यांचा हिरमोड झाल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, उर्जा मंत्री हाय हाय, चोरीच्या मार्गाने पळून जाणार्‍या ऊर्जा मंत्र्याचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, भारनियमनाविरोधात उर्जा मंत्र्यांना कंदीलदेखील भेट देण्याचे नियोजन होते मात्र त्यापूर्वीच मंत्री निघून गेले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शामराव धनगर, गजानन वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, डॉ.सादिक, रमेश पालवे, अनिल बंजारी, किरण वंजारी, भाजयुमो शहराध्यक्ष आकाश निमकर, कमलाकर मराठे, कदीर सेठ, साबीर कुरेशी, गजानन वंजारी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मनीषा पाटील, योगेश माळी, गंभीर माळी, बळीराम सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.