पुणे । ‘इंग्रजी नावाची भाषा असते हे मला सातवीपर्यंत देखील माहीत नव्हते. अशा ग्रामीण वातावरणात मी वाढलो. आई-वडिलांनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि माझ्या शिक्षणासाठी शेतजमीन विकायची तयारी ठेवली.विधीच्या शिक्षणासाठी आल्यावर दिवंगत विलासराव देशमुखांसारखे मित्र मिळाले. विद्यापीठात प्रथम आल्याचे कळाल्यावर खर्या अर्थाने आपण देखील काही करून दाखवू शकतो हा आत्मविश्वास जागा झाला, असा आठवणींचा पट गेल्या पन्नास वर्षांहून अधिककाळ वकिली क्षेत्र गाजवलेल्या अॅड. भास्करराव आव्हाड यांनी उलगडला तेव्हा उपस्थित श्रोतेही भारावून गेले.निमित्त होते; आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित यांच्या हस्ते विशेष सत्कार सोहळ्याचे. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते अॅड. आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिभा मोडक, अॅड. प्रमोद आडकर, अॅड. आव्हाड, डॉ. सबनीस आणि मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
व्यवसायामुळे माणसे वाचायला शिकलो
आव्हाड म्हणाले, कोर्ट असो किंवा खासगी आयुष्य या व्यवसायामुळे माणसे वाचायला शिकलो. अलीकडच्या वकिली व्यवसायाकडे वळालेल्या नवोदित वकिलांचे निरिक्षण केले असता ही पिढी खूप विस्कळीत आणि मूल्यांना महत्त्व न देणारी असल्याचे दिसून येते. यात त्यांचा दोष नसून आमचाच दोष आहे, असे वाटते.
चालता-बोलता ज्ञानकोषच
जोशी म्हणाले, आव्हाडांनी त्यांच्या कार्यशैलीतून आर्दश वस्तूपाठ निर्माण केला आहे. आव्हाडांचे वकिली व्यवसायासोबतच इतरही क्षेत्रातील ज्ञान पाहता आव्हाड हे चालता-बोलता ज्ञानकोषच आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. यावेळी डॉ. सबनीस व प्रतिभाताई शाहू मोडक यांनी मनोगत व्यक्त केले.