विरुध्द दिशेने येणार्‍यांवर आता गुन्हा दाखल

0
तळेगाव दाभाडे पोलिसांनी केली कारवाई
तळेगाव दाभाडे : रस्त्यावर धोकादायक वाहन चालवून विरुध्द दिशेने येणार्‍या वाहन चालकांवर यापुढे भारतीय दंड संहितेचे कलम 279 अन्वये गुन्हा नोंदवला जाईल. यास अनुसरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याकडून तीन वाहन चालकांवर गुन्हे नोदाविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर.के.पदामनाभन यांच्या आदेशानुसार सर्व सामान्य नागरिकाचे जीविताचे सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या कक्षेत धोकादायक रितीने वाहन चालवून विरुध्द दिशेने येणार्‍या वाहन चालकावर यापुढे भारतीय दंड संहितेचे कलम 279 अन्वये गुन्हा नोंदवला जाईल. याप्रमाणे भविष्यकाळात गुन्हे नोंदविले जाईल, असे या आदेशान्वये कळविले आहे.
आरोपपत्र कोर्टात दाखल
तळेगाव स्टेशन परिसर, सोमाटणे व उर्से परिसरात धोकादायकरित्या विरुध्द दिशेने वाहन चालवून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न करणार्‍या तीन वाहनचालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही अश्या प्रकारचे कृत्य कारणार्‍या व्यक्तीची गय न करता त्यांच्याविरुध्द आरोप पत्र कोर्टात दाखल करण्यात येईल. या गुन्ह्यास 6 महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. यासाठी नागरिकांनी व वाहन चालकांनी याबाबत खबरदारी घ्यावी, असे अवाहन वाघमोडे यांनी केले.