जळगाव । चाळीसगाव विभागाचे तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक मनोज लोहार खंडणीप्रकरणी न्यायालयात फिर्यादी डॉ. उत्तमराव महाजन यांच्या उलटतपासणीला न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात सुरुवात झाली. संशयित आरोपींच्या वकीलांनी डॉ. उत्तमराव महाजन यांची मंगळवारी उलटतपासणी घेतली. उलट तपासणीवेळी डॉ.उत्तमराव महाजन यांची प्रकृती बिघडली होती. दरम्यान, या गुन्हाच्या खटल्याचे पुढील कामकाज 19 जानवोरी रोजी होणार आहे. अपूर्ण उलटतपासणी ही त्या दिवशी पुर्ण होईल.
तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. या गुन्हयाच्या खटल्याप्रकरणी न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात कामकाज सुरु आहे. या गुन्हाच्या खटल्यात डॉ. उत्तमराव महाजन यांची उलटतपासणी न्यायालयात सुरु आहे. त्यानुषंगाने संशयित आरोपी मनोज लोहार यांचे वकील अॅड. निलेश घाणेकर व अॅड. सुधीर कुळकर्णी यांनी आज डॉ. उत्तमराव महाजन यांची उलटतपासणी घेतली. उलटतपासणीवेळी वकीलांनी फिर्यादी महाजन यांना किसान ज्ञानोदय संस्थेमधील नवीन बांधकामाच्या खर्चाबाबतची माहिती, करारनामा, बिले, व्हाऊचर माहिती विचारली. यावेळी महाजन यांनी कॅन्ट्राक्टरशी कुठलाही करारनामा केलेला नसल्याचे कबुल केले आहे. तसेच या कामासाठी 1 कोटी 39 लाख 12 हजार 462 रुपये खर्च झाला आहे. त्यापैकी कॅन्ट्राक्टरला किती पैसे दिले असे विचारले असता, डॉ. महाजन यांनी किती पैसे दिले याबाबत आठवत नसल्याचे सांगितले.
कर्मचार्यांबाबत दिली माहिती
वकीलांनी बांधकामबाबत माहिती विचारली असता, याबाबत किती बांधकाम झाले याबाबत आठवत नसल्याचे सांगितले. वकीलांनी डॉ. महाजन यांच्या मेडिकल कॉलेज मध्ये किती कर्मचारी आहे याबाबत विचारले, यावर महाजन यांनी सुरवातील आठवत नाही असे सांगितले व त्यानंतर लगेचच 80 ते 85 कर्मचारी असल्याचे सांगितले.
या वेळात झाली उलट तपासणी
डॉ. महाजन यांनी साक्षीदरम्यान सांगितले होते की, 30 जुन 2009 रोजी 11 वाजेपासून डांबून ठेवलेले असतांना रात्री केवळ 9.30 वाजता पैश्यासाठी सासर्याशी एकदाच बोलले असल्याचे सांगितले होते. परंतू त्यांच्या मोबाईलच्या सीडीआर वरून डॉ. महाजन यांचे मुलगा, सासरे, माजी आमदार जाधव यांच्याशी अनेकदा बोलणे झाले असल्याचे वकीलांना न्यायालयासमोर निर्देशनास आणून दिले. डॉ. महाजन यांची न्यायालयात दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत व दुपारी 3 ते 4.30 पर्यंत उलटतपासणी घेण्यात आली.
यांनी पाहिले कामकाज
दरम्यान डॉ. महाजन हे हार्ट पेशन्ट असून बराचवेळ न्यायालयात उभे असतांना त्यांना जाणवू लागला होता. प्रकृती बिघडली नव्हती असे त्यांचे वकील अॅड. अविनाश पाटील यांनी सांगितले. डॉ. उत्तमराव महाजन यांच्यावतीने अॅड. पंकज अत्रे, अॅड. अविनाश पाटील यांनी तर मनोज लोहार यांच्यावतीने अॅड. निलेश घाणेकर व सुधीर कुळकर्णी कामकाज पाहत आहे. या खटल्याचे पुढील कामकाज दि.19 रोजी होणार आहे.