नवी मुंबई । सिडकोतर्फे उलवे सेक्टर 19 येथे विकसित करण्यात आलेल्या उलवे अग्निशमन केंद्राचा लोकार्पण सोहळा दिनांक शुक्रवारी रोजी दिवंगत शहीद तुलसीदास रघुनाथ घरत यांच्या वीरपत्नी काशीबाई तुलसीदास घरत यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी आमदार मनोहर भोईर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगावकर, मुख्य अग्निशमन अधिकारी, सिडको, अरविंद मांडके, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, पनवेल राजेंद्र पाटील तसेच सिडकोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिडको महामंडळ केवळ शहरे वसवणे किंवा इमारती बांधणे यावर मर्यादित न राहता या शहरातील लोकांना सुरक्षित व उत्तम प्रकारचे जीवनमान देण्यात नेहमीच यशस्वी राहिले आहे.
अग्निशमन जवानांचे मनोबल नक्कीच उंचावेल!
वीरपत्नी घरत यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करून सिडको महामंडळाने अग्निशमन जवानांच्या महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कार्याची जाण असल्याची पावती दिली. यामुळे अग्निशमन जवानांचे मनोबल नक्कीच उंचावेल, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला. सिडको कार्यक्षेत्रात सध्या नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, द्रोणागिरी व आता उलवे या नोड्समध्ये अग्निशमन केंद्रे आहेत. स्मार्ट सोबतच आपली सिटी सेफसुद्धा असावी या दृष्टिकोनातून सिडकोने नेहमीच आवश्यक त्या सर्व सुविधा नवी मुंबईतील नागरिकांना पुरवल्या आहेत, असे विनय कारगावकर यांनी स्पष्ट केले. भविष्यात जर यदा कदाचित दुर्घटना घडली, तर सदर ठिकाणी सेवा पुरवण्याचा वेळ (रिस्पॉन्स टाइम) कमी असावा, असे आवाहनदेखील कारगावकर यांनी केले.
के. डी. जाधव यांचा सत्कार!
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सदर अग्निशमन केंद्राचा आराखडा तयार करणार्या अति. मुख्य वास्तुतज्ज्ञ रेखा धर व अग्निशमन केंद्र उभे राहण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले कार्यकारी अभियंता के. डी. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या केंद्राचे पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. अग्निशमन सेवेच्या प्रथेप्रमाणे बेल वाजवून हे अग्निशमन केंद्र नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्याचे जाहीर करण्यात आले.