उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा गौरव

0

पिंपरी-चिंचवड : स्टुडंटस् ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा ऑलिम्पिक असोसिएशनचे पुणे जिल्हाध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मोरवाडी येथील एस. एन. बी. पी. विद्यालयात रविवारी (दि. 23) या स्पर्धा पार पडल्या. यावेळी स्टुडंटस् ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश नलावडे, सचिव विजय टेपुगडे, एस. एन. बी. पी. विद्यालयाचे क्रीडा पर्यवेक्षक फिरोज शेख उपस्थित होते.

700 खेळाडूंचा सहभाग
स्टुडंटस् ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत 13 शाळांमधून 700 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये चेस, कॅरम, कबड्डी, योगा, बॅडमिंटन, कराटे, तायक्वांदो, वुशू आणि कुंगफू या खेळांचा समावेश करण्यात आला होता. एस. एन. बी. पी. स्कूल, पी. के. आंतरराष्ट्रीय शाळा आणि सिटी इंटरनॅशल स्कूलला विजेतेपद मिळाले.

खेळांमुळे एकाग्रता वाढते
याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना अमित गोरखे म्हणाले, खेळामुळे आरोग्य चांगले राहते. मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळले पाहिजेत. अशा प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांमधून भविष्यात उत्कृष्ट खेळाडू तयार होतील. विजेत्या खेळाडूंचा व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या क्रीडा शिक्षकांचा तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा आणि स्पर्धा यशस्वी करणार्‍या पंचांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला.