उल्हासनगरच्या महापौरांना दफनभूमीबाबत अखेर आली जाग!

0

उल्हासनगर (सुभाष भोसले) । जनशक्ती या वर्तमानपत्रात उल्हासनगरमध्ये राहणार्‍या मुस्लीम समाजातील लोकांना अंबरनाथ शहरातील मुस्लीम कब्रस्तानात प्रेत दफन करण्यासाठी मुस्लीम जमातचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी यांनी 15फेब्रुवारीपासून करण्यासाठी मज्जाव केल्याचे वृत्त छापून आले होते. जनशक्तीच्या वृत्तानंतर उल्हासनगर महापलिकेला जाग आली असून, महापौर मीना आयलानी यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करून, उल्हासनगरमधील कब्रस्तानचा प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत शहरातील मुस्लीम समुदायाला अंबरनाथमधील कब्रस्तानमधील जागा वापरू देण्याची विनंती अंबरनाथ मुस्लीम जमात अध्यक्षांना केली आहे. अंबरनाथ शहरात मुस्लीम समुदायाची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना दफन करण्यासाठी सध्याच्या कब्रस्तानमधील जागा अपुरी पडत आहे. यासंदर्भात मुस्लीम जमातचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी यांनी महापौर आयुक्त उपमहापौर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी सलीम चौधरी यांनी अंबरनाथमधील कब्रस्तानाचा वापर करू देण्यास मनाई केली होती. उल्हासनगर शहरात सुमारे एक लाखादरम्यान मुस्लीम लोक संख्या आहे की गेले तीस वर्षे मुस्लीम बांधव दफनभूमीसाठी संघर्ष करत आहे. पण त्यांच्या या प्रश्‍नाकडे आतापर्यंत कोणीच लक्ष दिले नव्हते. निवडणुका आल्या की राज्यकर्त्यांना मुस्लीम समुदायाची आठवण येते. आश्‍वासने दिली जातात, पण निवडणूक झाली की विसर पडतो, अशी प्रतिक्रिया या समुदायातील लोकांनी दिल्या.

मुंबई उच्च न्यायालयाने नं.7447/2012च्या केस मध्ये न्यायाधीश ए. एम. खानविलकर व के. के ताटेड यांनी 8/1/2013रोजी दफनभूमी साठी कैलास कोलोनी जवळील प्लॉट नं73ते 740आणि प्लॉट नं747ते752 म्हणजे नवीन आरक्षण नं244,शीट नं.71 या दोन एकर जागेवर दफनभूमीसाठी जागा द्यावी असा आदेश दिला होता. उल्हासनगर पालिकेच्या महासभेत यासंदर्भातील ठरावही मंजूर झाला होता. पण तरीसुद्धा मुस्लीम समुदायाला कब्रस्तानासाठी जागा देण्यात आली नव्हती.

कब्रस्तानासाठी पायी दिल्लीला
कब्रस्तानासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या मागणीसाठी मुस्लीम समाजाचे युवा नेते शकील सय्यद खान एक वर्षापूर्वी पायी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्पती यांना निवेदन दिले होते. दफनभूमीसंदर्भात विचारले असता शकील खान म्हणाले, आम्ही गेल्या तीस वर्षांपासून दफनभूमीसाठी संघर्ष करत आहोत. जो भूखंड पालिका दफनभूमीसाठी देत आहेत त्यावर पूर्वीपासून आरक्षण होते आणि ते शहर विकास आराखड्यातसुद्धा आहे त्यामुळे नुसते आश्‍वासन न देता आमची दफनभूमीची जागा आमच्या ताब्यात द्यावी आणि एकदाचा हा प्रश्‍न मार्गी लावावा. म्हणजे आमची समस्या सुटेल.