उल्हासनगर । स्थायी समितीच्या बैठकित मंजुर करण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे नुतनीकरण करण्यात येणार्या 17 उद्यांनामध्ये वीर जिजामाता उद्यानाचा समावेश करुन त्याठिकाणी असलेल्या शिवसृष्टीत शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महालेंचे भित्तीशिल्प लावावे अशी मागणी अखिल भारतीय जीवा सेनेने महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, महापौर मीना आयलानी यांच्याकडे केली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे.या बैठकित उल्हासनगर शहरातील 56 उद्यानांचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शहरातील बहुतांश उद्यानाची दुरवस्था झाली असल्याने 17 कोटी खर्चून त्यांच्या सुशोभिकरणासाठी 17 कोटी रुपयांच्या खर्चास या बैठकित मंजुरी देण्यात आली.
17 उद्यानांचे त्वरीत नूतनीकरण
यावेळी 56 उद्याना पैकी 17 उद्यानांच्या नुतनीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील वीर जिजामाता उद्यानात असलेल्या शिवसृष्टीत महापालिकेने याआधीच जिवाजी महालेंचे भित्तीशिल्प लावण्यास मंजुरी दिली होती. पण निधी नसल्यामुळे हे काम मागील पाच वर्ष रखडले होते. आता उद्यानांच्या नुतनीकरणांसाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे जिवाजी महाले यांचे भित्तीशिल्प लावण्याच्या मागणीने जोर धरला आहे. यासाठी अखिल भारतीय जीवा सेनेने आयुक्त राजेंद्र निंबाळकर व महापौर मीनाआयलानी ,उपमहापौर जीवन ईदनानी,स्थायी समितीच्या सभापती लुंड यांना साकडे घातले आहे.