उल्हासनगर । उल्हासनगर शहराचे बकालीकरण दूर व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार डॉ. बालाजी किणहकर यांच्यासह केलेल्या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी सुमारे पंचवीस कोटी रुपयांच्या चार प्रमुख रस्त्यांचे भूमिपूजन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय रामनगर येथे खासदार निधीतून होणार्या लहान साकवच्या कामाचेही भूमिपूजन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
एमएमआरडीएच्या एमयूआयपी योजनेअंतर्गत उल्हासनगर – 4 मधील भरत नगर येथील कानसाई पूल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळा, उल्हासनगर-4मधील सेक्शन-25 येथील कारंजा आर.ओ.बी. व्हाया लालचक्कीपर्यंतचा रस्ता, उल्हासनगर शहराकडे जाणार्या कैलाश कॉलनी ते पालेगाव जकात नाका तसेच अंबरनाथ दुर्गा पाडा व आकाश कॉलनी ते पालेगाव या चार रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन झाले. सिद्धार्थनगर येथील पाण्याच्या टाकीखाली खासदार निधीतून विकसित होणार्या उद्यानाच्या कामाची पाहणी याप्रसंगी डॉ. शिंदे यांनी केली.
शहरातील रस्ते नव्याने करणार
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, माजी महापौर अपेक्षा पाटील, उपशहरप्रमुख परशुराम पाटील, नगरसेवक आकाश पाटील, प्रमोद टाले, विकास पाटील, सिंधी सेनेचे रवी खिलनानी, एमएमआरडीएचे उपअभियंता टेंबुर्लेकर, उल्हासनगर महापालिकेचे, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या सक्षमीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर दिला असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांचे सक्षमीकरण हाती घेण्यात आले आहे. उल्हासनगरमधील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी, यासाठीदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार. डॉ. किणीकर पाठपुरावा करत होते.