उल्हासनगरला चवताळलेला तरुण रुग्णालयात चावत सुटला

0

उल्हासनगर । नागरिकांना चावा घेण्यासाठी धावणार्‍या तरुणाला त्याचा मित्राने उपचारासाठी रुग्णालयात आणले आणि त्यानंतर जे झाले ते पाहून सगळेच अवाक झाले. लोकांना चावा घेण्यासाठी धडपडणार्‍या या तरुणाची धास्ती घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचार्‍यांसह इतर नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. येताजाता नागरिकांना चावा घेण्यासाठी धावणार्‍या एका तरुणाला त्याच्या सहकार्‍याने तोंडाला काळा कपडा बांधून रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र, या तरुणाने रुग्णालयातील कर्मचार्‍यांसह इतर नागरिकांना चावा घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. त्या तरुणाने रुग्णालयातील ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला चावा घेण्याचा प्रयत्न करत ओरबडून जखमी केल्याने सर्वत्र पळापळीचे वातावरण निर्माण झाले होते.

कर्मचार्‍यांना चावण्याचा प्रयत्न
उल्हासनगर रुग्णालयात सेवेत असणारे पोलीस हवालदार अरूण केदार हे दुपारी दीडच्या सुमारास रुग्णालयात उपस्थित होते. त्यादरम्यान उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका तरुणाने त्याच्यासोबत काम करणार्‍या एका तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. 25 ते 30 वयोगटातील त्या तरुणाचे पूर्ण मुंडके काळ्या कपड्याने बांधलेले होते. केदार यांनी त्या तरुणाबाबत चौकशी केली असता त्या तरुणाने काळा कपडा तोंडावरून बाजूला करत केदार यांच्या मानेचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा केदार यांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करताच त्या तरुणाने त्यांच्या हाताला ओरबडून त्यांना जखमी केले. इतकेच नव्हे तर हा तरुण रुग्णालयातील इतर नागरिकांना आणि कर्मचार्‍यांनादेखील चावा घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना याचा खूपच त्रास झाला.

रॅबिजची लागण झाल्याचा संशय
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता केदार यांनी त्वरीत पोलिसांना फोन करत घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर लगेचच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. या चवताळलेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न त्याच्या सहकार्‍याने केला. मात्र हा चवताळलेला तरूण येणार्‍या जाणार्‍यांना पकडण्याचा प्रयत्न करीत चावा घेऊ लागल्याने अखेर पोलिसांनी हातात दांडके घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी या चवताळलेल्यान तरुणाला रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. मात्र, हा तरुण रस्त्यावरच्या लोकांनादेखील चावा घ्यायचा प्रयत्न करू लागल्याने अखेर त्या तरुणाच्या सहकार्‍याने त्याला रिक्षात कोंबून सोबत नेले. या तरुणाला नेमके काय झाले होते याचे कारण समजले नसले तरी त्याला रॅबिज झाला असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये केली जात होती.