उल्हासनगरात पोलिसाला मारहाण

0

उल्हासनगर । वाहतूक पोलिसाच्या मोटरसायकलचा धक्का लागल्याने त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी करत 7 ते 8 सहकार्‍यांच्या मदतीने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडली. याप्रकरणी शशिकांत व सद्दाम यांना अटक करण्यात आली आहे. कल्याण येथील वाहतूक शाखा विभागात पोलीस शिपाई मच्छेंद्र माळी(35) हे कार्यरीत असून ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून शांतीनगर पोलिस चौकी समोरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने मोटरसायकल नेणार्‍या चालकाने कोणताही इंडीकेटर न दाखवता तसेच कोणताही इशारा न करता अचानकपणे रस्ता क्रॉस करीत असताना माळी यांच्या गाडीचा त्या मोटरसायकलला धक्का लागला.

दोघांना केली अटक
मोटरसायलकलवर बसलेले शशिकांत राय (33) व सद्दाम खान (23) यांनी माळी यांच्याकडे नुकसान भरपाई म्हणून पैशांची मागणी करीत आपल्या 7 ते 8 सहकार्‍यांना त्याठिकाणी बोलावून घेतले. पोलीस शिपाई मच्छेंद्र माळी हे सरकारी कामावर जात असताना त्या सर्वांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात शशिकांत व सद्दाम व त्यांच्या 7 ते 8 सहकार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत व सद्दाम यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.