उल्हासनगर महानगरपालिकेच्या २६ मालमत्तांचा जाहीर लिलाव होणार

0

उल्हासनगर : मालमत्ता कर बुडविणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ मालमत्ता प्रत्येकी १ रुपयांनी खरेदी करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे . या मालमत्ताधारकांना वारंवार नोटीस बजावल्या तरी त्यांनी मालमत्ताकर भरला नाही .

उल्हासनगर महानगरपालिकेत सुमारे १ लाख ७० हजार मालमत्ताधारक राहत असून त्यापैकी ९० हजार मालमत्ता धारकांची सुमारे २९४ कोटी मालमत्ता कराची थकबाकी प्रलंबित आहे . ३१ मार्च २०१७ हे कार्तिक वर्ष संपण्यापूर्वी तरी मालमत्ता कर काही प्रमाणात भरला जाईल अशी अपेक्षा होती मात्र त्यात कोणताही फरक पडलेला नाही . मालमत्ता कराची सुमारे ८० टक्के मालमत्ताधारकांनी त्यांचा थकीत तसेच चालू वर्षाचा मालमत्ता कर भरलेला नाही . त्यामुळे अशा सर्व करबुडव्या मालमत्ताधारकांविरुद्ध सक्तीच्या व कठोर उपायांद्वारे कारवाई करण्याशिवाय महानगरपालिकेकडे पर्याय नव्हता .

मालमत्ताकराची जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी शहरात ५ वेळा अभय योजना राबविली गेली व त्यात भरघोस सूटही देण्यात आली मात्र तरी देखील अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही . यानंतर मालमत्ता जप्ती व लिलावाची नोटीस बजावली व वर्तमानपत्रे व वृत्तवाहिनी मध्ये थकबाकीदरांची नावे प्रसिद्धी करणे आणि अशा मालमत्तेच्या ठिकाणी बॅण्डबाजासहित घोषणा करून बदनामी करणे असे सर्व मार्ग अवलंबल्यानंतर देखील अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही .

आता महानगरपालिकेने २६ मालमत्ता जप्त केल्या असून प्रत्येकी १ रुपयांनी विकत घेल्या आहेत . आता या मालमतांचा जाहीर लिलाव होणार असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर शिंदे यांनी जाहीर केले आहे . मालमत्ताकर हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्तोत्र असून त्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येतील असे ते म्हणाले .