उल्हासनगर महापालिका मुख्यालयातील पार्किंग झाले चिखलमय

0

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयामागे असलेले पार्किंग चिखलमय झाल्याने महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकारांची गैरसोय झाली आहे. मुख्यालयातील दालनांवर वारेमाप खर्च करणारे प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका यानिमित्ताने होत आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी मुख्यालयाच्या मागे असलेल्या जागेत वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. या पार्किंगमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार आपल्या मोटारसायकल, कार आदी वाहने पार्किंग करीत असतात. पावसाळा सुरु झाल्यापासून हे पार्किंग चिखलमय झाल्याने वाहनचालकांचे हाल होत आहे. येथून वाहने काढणे म्हणजे जिकरीचे काम झाले आहे. मोटारसायकल काढत असताना अनेकजण पाय घसरून पडले आहेत. चिखलातून गाडी काढताना चाके जागीच फिरतात व त्यामुळे चिखल इतर गाड्यांवर उडतो. त्यामुळे चालक तसेच लोकांचे आपसातच भांडणे होतात.

पार्किंग बनविण्याचे टेंडर काढण्यात येणार आहे. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून येत्या सोमवारी खडी अथवा मुरूम टाकण्यात येईल. काही दिवसांपूर्वी व्हीटीसी मैदानात शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धा खेळविण्यात येत असताना टोकदार खडी टाकण्यात आली होती.
राम जैसवार, शहर अभियंता, उल्हासनगर महापालिका