ठाणे : उल्हासनगर येथील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली असून या संपूर्ण संकुलाचा तातडीने पुनर्विकास करण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत केली. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह 12 निवासी इमारतींचाही पुनर्विकास करण्याची गरज असून या रुग्णालयाचे रुपांतर सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करण्याची मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी केली.
उल्हासनगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालय संकुलात मुख्य रुग्णालयासह एकूण 13 इमारती आहेत. आयआयटी, मुंबईने मे महिन्यात या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मुख्य इमारतीसह एकूण 11 इमारती धोकादायक घोषित करून संपूर्ण पाडण्याची शिफारस केली आहे. उर्वरित दोन इमारतींचीही मोठ्या प्रमाणात दुरुस्ती सुचवण्यात आली आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करून या सर्व इमारतींच्या जागी नव्या इमारती बांधण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी केली. उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय आहे. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रुग्णालयाची मंजूर कर्मचारी संख्या 248 असली तरी प्रत्यक्ष भरती केवळ 131 जणांची करण्यात आली आहे. रुग्णालयातील अनेक उपकरणे 40 वर्षे जुनी आहेत. पोर्टेबल एक्स रे मशीन, पल्स ऑग्झिमिटर, बेडसाइड मॉनिटर, फ्युमिगेशन मशिन यांसारखी साधी उपकरणेही या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. या रुग्णालयात शस्त्रक्रिया होत नाहीत. साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही, असा अडचणींचा पाढाच खा. डॉ. शिंदे यांनी वाचला.