उल्हासनगर रेल्वेस्थानकात सुविधांचा उडाला बोजवारा

0

ठाणे । स्वच्छतेबाबत एकीकडे ठाणे व कल्याणसारखी मोठी रेल्वेस्थानके अत्यंत बकाल जाहीर झाली असताना उल्हासनगर स्थानकही कमालीचे अस्वच्छ दिसून येत आहे. उल्हासनगर रेल्वेस्थानक परिसरातच बकर्‍या बांधून ठेवण्यात आल्याचे प्रवासी संघटनांच्या पाहणीत समोर आले. या प्रकाराबाबत प्रवाशांनी सडकून टीका केली असून, बांधलेल्या बकर्‍यांचे फोटो रेल्वेमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.

उल्हासनगर हे व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. येथे आरकेटी व सीएचएमसारखी मोठी कॉलेजही असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने येथून प्रवासी ये-जा करतात. आता ही संख्या वाढून दिवसाला किमान 80 हजार प्रवाशांपर्यंत गेली आहे. येथे अवघे 2 प्लॅटफॉर्म असले तरी तेदेखील स्वच्छ राखले जात नाहीत. याबाबतच्या तक्रारी आल्यावर कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव श्याम उबाळे व भरत खरे यांच्यातर्फे या स्थानकातील गैरसोयींची नुकतीच पाहणी करण्यात आली. त्यावेळी येथील कचराकुंड्या कचर्‍याने भरून वाहत असल्याचे दिसून आले.

रेल्वेस्थानकातील सरकते जिने नावापुरती
स्थानक बकाल असताना येथील पादचारी पुलाखाली मोकळ्या जागेत चक्क 3 ते 4 बकर्‍या बांधून ठेवण्यात आल्याचे चित्र यावेळी प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना आढळले. काही प्रवाशांनी अशा पद्धतीने रोजच बकर्‍या बांधून ठेवलेल्या असतात, अशी माहिती त्यांना दिली. हे फोटोे रेल्वेमंत्र्यांच्या ट्वीवर हँडलवर पाठवणार असल्याची माहिती श्याम उबाळे यांनी दिली. सरकता जिना काही दिवस सुरळीत चालला, पण काही दिवसांतच वारंवार बंद पडू लागल्याने त्याचा उपयोगच होत नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व महिलांचे हाल होत आहेत. इतर प्रचंड प्रवासीसंख्या असलेल्या स्थानकांमधील सरकते जिने सुरळीत सुरू असताना तुलनेने कमी प्रवासी असलेल्या उल्हासनगरात मात्र रेल्वेला त्याची देखभाल का करता येत नाही, असा प्रश्‍न संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केला.