पुणे : पीएमपीएमएलचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी विभागाला शिस्त लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला. सकाळी कामावर उशिरा आलेल्या सव्वाशे कामगारांना विदाउट पे काम करावे लागेल, असे त्यांनी बजावले.
तुकाराम मुंढे हे कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखळे जातात. पुणे शहरातील सार्वजनिक बससेवा सुधारण्यासाठी त्यांच्यासारखा कर्तवनिष्ठ अधिकारी हवा, अशी मागणी होत होती. मुंढे यांनी बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचार्यांना कामाच्या शिस्तीबाबत बजावले होते. मात्र, गुरुवारी सुमारे सव्वाशे कर्मचारी सकाळी उशिरा कामावर आल्याने त्यांचा दिवसाचा पगार कापण्याची कारवाई मुंढे यांनी केली. त्यांच्या या शिस्तीच्या बडग्यामुळे कामचुकार कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
पीएमपीच्या अनेक बस सध्या नादुरुस्त आहेत. त्यांचा आढावाही मुंढे यांनी घेतला. तसेच, त्यातील 100 बसेसच्या दुरुस्तीसाठी त्यांनी गुरुवारी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच, पुढील 15 दिवसांत त्या बस रस्त्यावर आल्या पाहिजेत, याची जणीव संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना करून दिली. त्यामुळे पुढील 15 दिवसांत या बस रस्त्यांवर धावू लागतील, अशी आशा आहे. मुंढे यांच्या या निर्णयामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.