‘उशिरा का होईना न्याय मिळाला’: राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया

0

लखनौ: १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज बुधवारी ३० रोजी ऐतिहासिक निकाल दिला. लखनौ विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी झाली. २८ वर्षापूर्वीच्या या ऐतिहासिक खटल्यातील सर्वचे सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान या निकालानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. भाजप नेते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह यांचे अभिनंदन केले आहे. उशिरा का होईना पण न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे. निकालानंतर संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. विहिप, आरएसएससह राजकीय पक्ष आणि हिंदुवादी संघटनेकडून जल्लोष साजरा होत आहे.

विश्वहिंदू परिषद, आरएसएस, भाजपचे काही नेत्यांनी मिळून बाबरी मशीद पडल्याचे आरोप करण्यात आले होते. पूर्वनियोजित कट रचून बाबरी मशीद पाडण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह ३२ आरोपी होते. सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे.