जव्हार । वीज वितरण कंपनीच्या वीज आकार देयकांमुळे ग्राहकांत असंतोष निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनी ग्राहकांची सर्रास लूट करत आहे. ग्राहकांनी वापरलेल्या वीज वापराची माहिती दर महिन्यात मीटरचे फोटो घेऊन मासिक आकार देयके देऊन पैसे आकारण्यात येतात. वीज देयक आकारामध्ये स्थिर आकार, प्रति जोडणी, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क इत्यादी छुप्या करांची आकारणी केल्याचे दिसून येत आहे. यामुळे वीजबिलांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. मीटर रीडिंग एजन्सीवर महावितरण कंपनीचे नियंत्रण राहिलेले नाही.
छुपे कर ग्राहकांना न परवडणारे
1 एप्रिल 2017 पासुन वीज वापराचे नवीन दर लागू झाले आहेत. घरगुती वीज वापरायचा दर युनिटच्या टप्प्यांवर अवलंबून असतो. विजेचा वापर 100 युनिटच्या आत असेल तर, देयक वाजवी येते. जर 100 च्या वर गेल्यास युनिटच्या दरात दुप्पटीने वाढ होते. याशिवाय इतर छुपे कर लावले जातात. त्यामुळे वीजबिल ग्राहकांना न परवडणारे आहेत. देयकांत स्थिर आकार 60 रुपये, प्रति ग्राहक जोडणी महिना, वहन आकार 1.21 रुपये प्रति युनिट, इंधन समायोजन आकार, इत्यादी आकारून ग्राहकांकडून वसुली केली जाते.
रिडिंग एजन्सीवर नाही महावितरणचे नियंत्रण
महावितरण ग्राहकांच्या वीज वापर मीटरची रिडिंग खासगी एजन्सीकडून केले जाते, मीटर रीडिंग एजन्सीवर महावितरण कंपनीचे नियंत्रण राहिलेले नाही. कायद्याने 30 दिवसांचे वीजबिल देने बंधनकारक असूनही महावितरण कडून वीज ग्राहकांना फॉल्टी मीटर दाखवत सरासरी वीजबील देण्यात येतात. अश्या प्रकारची देयके देऊन वसुली केली जाते.
ग्राहकांना वीजबिल मुदतीच्या अगदी 1 ते 2 दिवस शिल्लक असताना मिळते, बिल उशिरा मिळाल्याने वितरण कंपनीचा फायदा होत असल्याने वेळेवर बिल दिले जात नाही. परिणामी, मुदतीत बिल भरता येत नाही तसेच लेट फीचा बोजा ग्राहकांवर पडत असून साधारणपणे 35,000 ग्राहकांची फसवणूक करून लूट करण्यात येत आहे.
– दिलीप पटेकर, ग्राहक