डॉ. निलाभ रोहन करणार का कारवाई? ; सुज्ञ नागरिकाने दिली होती फोनवरुन माहिती
जळगाव : शहरात जमावबंदीचे आदेश लागू असून आचारसंहिता सुरु आहेत. असे असतानाही रात्री 10 वाजेनंतरही शहरातील काही हॉटेल सुरु राहत असल्याचे चित्र आहे. एका सुज्ञ नागरिकाने पत्रकारांच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना अशाच एका एमआयडीसी हद्दीत उशीरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेलची माहिती दिली. मात्र अधिकारी पोहचण्यापूर्वीच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचार्यांनी हॉटेल मालकांना खबर दिल्याचा प्रकार समोर आला होता. हॉटेल मालकांना खबर पोहचविणार्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ते अधिकारी, कर्मचारी कोण असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्यावर पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन कारवाई करणार का? हा प्रश्न कायम आहे.
त्या कर्मचारी, अधिकार्यांचे काय?
शनी पेठ पोलीस स्टेशनचे अनिल विश्वनाथ धांडे व रवींद्र एकनाथ गुरचळ या दोघांना अवैध धंदे भोवले आहेत. वारंवार सूचना देऊनही अवैध धंदे सुरु ठेवण्यास धंदे चालकांना पाठबळ दिले म्हणून सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी दोघांचा कसुरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्यावर डॉ.उगले यांनी सोमवारी दोन्ही कर्मचार्यांची मुख्यालयात बदली केली. नीलाभ रोहन यांनी उपविभागातील काही अधिकार्यांना नोटीसाही बजावल्या आहेत, असे असले तरी इतर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांच्या अर्थपूर्ण पाठबळाने उशीरापर्यंत हॉटेल परमीट रुम बियर बार सुरु असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावरही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तिघांवर निलंबनाची कुर्हाड
भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनचे योगेश माळी, शशिकांत तायडे या दोघांनी भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष नईम पठाण यांचा मुलगा जुबेर खान पठाण याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी रविवारी दोन्ही पोलिसांविरुध्द गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती. हा ठपका ठेवून दोघांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुख्यालयातील कुणाल विठ्ठल सोनवणे याने मित्रांसह नांदुरा येथे तरुणाला रिव्हॉल्वर लावून मारहाण करुन लुटले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणाल यालाही अटक करण्यात आली होती. कुणाला हा देखील भुसावळचाच रहिवाशी असून मुख्यालयात नियुक्तीला आहे. नांदुरा पोलिसांनी तसेच मुख्यालयाच्या निरीक्षकांनी कुणाल याचा कसुरी अहवाल पाठविला होता. त्याचेही निलंबन करण्यात आले आहे.