पहिला आणि दुसरा आठवडा संपूर्णपणे वाया गेल्यानंतर अर्थसंकल्प पार पडला. शेतकरी कर्जमाफी आणि 19 आमदारांचे निलंबन झाल्याने विरोधक गायब आहेत. मात्र विरोधक नसतानाही कुठल्याही चर्चेशिवाय विधानसभेत मॅरेथॉन कामकाज चालू आहे. कार्यक्रम पत्रिकेतील कामकाज अगदीच ‘सुरळीत’ चालू आहे. लक्षवेधी, प्रश्नोत्तरे, अर्थसंकल्पावर विशेष चर्चा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी सदस्यांच्या चेहऱ्यावर या कामकाजामुळे समाधान मात्र दिसत नाही. आज सरकारने पिकविम्यातून 50 टक्के कर्जवसुलीबाबत आदेश देऊन शेतकरी कर्जमाफीच्या संवेदनशील मुद्दा सुरु असताना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांच्या घणाघातानंतर दुपारच्या नंतर लगेच ते परिपत्रक मागे घेण्यात आले.
विरोधकांच्या संघर्षयात्रेमुळे विधानभवनात सरकारवर दबाव वाढला की कमी झाला? हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे. संघर्षयात्रेतील घडामोडींची चर्चा जोरदार सुरु आहे. संघर्षयात्रेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा एकही चान्स सत्ताधारी सोडत नाहीयेत. आज दिवसभर संघर्षयात्रेचे केवळ खानपानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खरतर यासाठी भाजपच्या सोशल मिडियाच कौतुक करायला पाहिजे. विरोधकांच्या गोटात जाऊन असे फोटो आणणे आणि ताशेरे ओढणे सोपे कामी नव्हेच. याउलट विरोधकांकडे शेतकरी कर्जमाफीचा संवेदनशील मुद्दा असताना आणि प्रभावी मुद्दा असतानाही नेमकं कुठं कमी पडतात? हा सवालच आहे.
सरकारला वेठीस धरून अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या घडामोडीच्या दरम्यान सुद्धा अभूतपूर्व गोंधळ घालणारे सर्व विरोधक कधी येतील? हा सस्पेन्स आहेच. बाकी विरोधी पक्षातील एकादुसरा सदस्य आपापल्या कामासाठी आज परिसरात दिसून आला. मात्र संघर्षयात्रा अथवा पुढच्या भूमिकेवर कुणीच काही बोलायला मात्र तयार नव्हते. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा अर्थसंकल्पानंतर असाही सलाईनवर लागला आहे. त्यातच 19 आमदारांच्या निलंबनाने त्यातली हवा अजूनच काढली गेली. गेल्या शनिवारी गिरीश बापट यांच्या वक्तव्यावरून असं वाटत होत की चौथ्या आठवड्याच्या या पहिल्या दिवशी आमदार निलंबनावर चर्चा होईल. विधानसभेत गेल्या आठ्वड्यापासूनचा विरोधकांचा शुकशुकाट कायम आहे. विरोधकांच्या रिकाम्या बाकांकडे पाहून सगळे निर्णय घेतले जात आहेत. विरोधकांशिवाय संपूर्ण अधिवेशन जातेय कि काय? असं वाटायला लागलंय. हा आठवडा असाच जाण्याची शक्यता आहे मात्र शेवटच्या आठवड्यात काहीतरी तडजोड होईल अशी अपेक्षा आहे.