तरुणासह निमखेडीच्या वृद्धाचा समावेश
भुसावळ/रावेर- उष्माघाताचा फटका बसल्याने जिल्ह्यात दोघांचा बळी गेल्याची घटना सोमवारी दिवसभरात घडली. पहिल्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी शिवारात शेतात काम करीत असताना चक्कर येऊन पडल्याने पुंडलिक चांगो चौधरी (60, निमखेडी खुर्द) या वृद्धाचा मृत्यू झाला. उन्हाचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे तर दुसर्या घटनेत रावेर शहरातील खंचन मुरलीधर शिंदे (28, राजे शिवाजी चौक) या तरुणाचा उष्माघाताच्या फटक्याने सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला.
रावेरच्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू
खंचन शिंदे हा तरुण वडील मुरलीधर शिंदे यांच्यासोबत शेतात पाईप लाईनच्या कामासाठी गेल्यानंतर सोमवारी दुपारी घरी परतल्यानंतर त्यास पोटदुखी व मळमळचा त्रास सुरू झाला. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केल्यानंतर घरी आणल्यानंतर सायंकाळी पुन्हा त्याची प्रकृती खालावली व चक्कर येऊ लागल्याने दुसर्या रुग्णालयात हलवत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा आहे.
तापमान 46 अंशावर, जनजीवन असह्य
दिवसागणिक तापमानात वाढ होत असून जनजीवन असह्य झाले आहे. गेल्या दोन दिवसात तापमानात कमालीची वाढ झाली असून तापमान 45 ते 47 अंशापर्यंत पोहोचले आहे. नागरीकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये तसेच योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.