उसतोड मुकादमाचे अपहरण केल्याची खळबळ

0

चाळीसगाव शहर पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव – उसतोड मजुर पुरवण्याकामी पैसे घेऊनही मजुर पुरवले नाही, या कारणावरून तालु्नयातील सांगवी येथील उसतोड मुकादमाचे सांगलीतील तिघांनी अपहरण करून डांबून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सांगवी येथील राजाराम शंकर राठोड याने सांगलीतील एका साखर कारखान्याच्या मुकादमांशी उसतोड मजुर पुरवण्याचा ठेका घेतला होता. त्यापोटी पैसेही घेतले होते. मात्र हे मजुर पुरवले नाही वा पैसे परत केले नाही या कारणावरून सांगली येथील नितीन भिमराव देशमुख, संदीप तान्हाजी कुंभार व कृष्णा शंकर पवार या तिघांनी 17 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान रांजणगाव फाट्याजवळून राजाराम राठोड याचे अपहरण करून बोलेरो गाडीतून पळवून नेत इटकर ता. वाळवा जि. सांगली येथे डांबून ठेवले.राजाराम हा १७ रोजी सांगवी येथून मोटारसायकलवरून चाळीसगावकडे येत होता. सायंकाळी त्याची मोटारसायकल रांजणगाव फाट्याजवळ मिळून आली.

ही घटना राजारामचा भाऊ एकनाथ शंकर राठोड यास समजल्यावर त्याने भावाचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली. त्याचदिवशी बेपत्ता राजारामचा भावाला फोन आला आपले तिघांनी अपहरण केले असून डांबून ठेवल्याचे सांगितले. एकनाथ राठोड यांनी पोलीसांत धाव घेऊन ही माहिती दिली. पोलीसांचे एक पथक सांगली येथे जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने भावाचा शोध घेतला. मात्र राजारामने सांगलीच्या पोलीसांना मी माझ्या मर्जीने आलो असल्याचे लिहून दिले. मात्र संबंधीतांनी राजरामची सुटका केली नाही. त्यामुळे चाळीसगावी येताच एकनाथ राठोड यांनी तिघांनी भावाचे अपहरण केल्याची फिर्याद दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.