उसनवारीच्या पैशाच्या वादातून चुलतभावाचा खून

0

दोंडाईचा । शहरातील राणीमाँ साहेब प्लाझा येथे शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दोन चुलत भावांमध्ये हाणामारी झाली. यात एकाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मयताच्या मामाने पोलिसांत फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, खर्दे येथील तेजपाल रणजितसिंग गिरासे याने गावातील अरविंद रमणसिंग गिरासे (35) याच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. बरेच दिवसांपासून तेजपाल पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. काल दुपारी तेजपालला अरविंदने पैशांची मागणी केली असता दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. मारहाणीमुळे अरविंद हा बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तेजपाल आणि अरविंद चुलत भाऊ असून दोघेही ड्रायव्हर आहेत. कुलदिप जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने अरविंद गिरासेविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास पो.नि. पी.व्ही. मुंडे करीत आहेत.

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीस मारहाण
धुळे । तालुक्यातील खंडालय येथे दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीस बेदम मारहाण केली. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरूध्द पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. येथील मनिषाबाई भटू माळी (22) यांनी पती भटु नाना माळी यांना दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही. या कारणावरून मनिषाबाई माळी यांना भटु माळी यांनी बेदम मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही मारहाणीची घटना काल दि. 14 रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी मनिषाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भटु माळी यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहान मुलांच्या वादात इसमास बेदम मारहाण
पिंपळनेर । साक्री तालुक्यातील सामोडा येथे लहान मुलांच्या भांडणावरून गावातील तिघांनी एका इसमास बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामोडा येथे लहान मुलांच्या भानगडीवरून शामराव गावीत यांना गावातील नवल गावीत, पांडुरंग गावीत, जयवंती गावीत या तिघांनी बेदम झोडपले. तसेच शिवीगाळ करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही मारहाणीची घटना काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी उषाबाई गावीत यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ. मोरे यांना सोपविण्यात आला आहे.