उ. प्रदेशात 52 ठिकाणी गुरुवारी मतदान

0

लखनऊ । उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यांत 12 जिल्ह्यांतील 53 जागांसाठी गुरुवार 23 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या मतदानात 680 उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून, यातील 116 उमेदवारांवर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे यातील 95 जणांवर हत्या, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. चौथ्या टप्प्यांत होणार्‍या 21 मतदारसंघांतील किमान तिघा उमेदवारांनी त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची नोंद निवडणूक अर्जात केली आहे. पूर्वी उत्तर प्रदेशात स्वच्छ चारित्र्य असलेले अनेक नेते होते. कुठल्याही भ्रष्टाचारपेक्षा या नेत्यांनी देश आणि लोकसेवेेला प्राधान्य दिले होते. पण मागील काही निवडणुकांमधून राज्यातील अशा उमेदवारांची संख्या कमी होत चालली आहे. निवडणुकीच्या बदलेल्या स्वरूपामुळे अशी मंडळी निवडणुकींपासून दोन हात लांब राहत असलेले पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉम्स या संस्थांनी चौथ्या टप्प्यांच्या निवडणुकीतील उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रांचे विश्‍लेषण केले आहे. हे सर्व उमेदवार राज्यातील 98 विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यात सहा राष्ट्रीय पातळीवरील, पाच राज्य पातळीवरील, 87 मान्यता न मिळालेल्या पक्षांसह 200 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यांतील निवडणुकीत एक कोटी 84 लाख 82 हजार मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या मतदारांमध्ये एक कोटी 31 हजार पुरुष, 84 लाख 50 हजार महिला आणि 1034 थर्डजेंडर मतदारांचा समावेश आहे.

भाजपचे सर्वाधिक उमेदवार
महाराष्ट्रात झालेल्या महापालिका, जिल्हा पंचायतींच्या निवडणुकीत भाजपच्या गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत मोठी चर्चा झाली होती. हेच चित्र उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही पाहायला मिळाले आहे. हत्या, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरणचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचार अशा गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार भाजपचे आहेत. भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 48 पैकी 19 उमेदवारांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. बहुजन समाज पार्टीच्या 53 पैकी 12, आरएलडीचे 39 पैकी 9, समाजवादी पार्टीच्या 33 पैकी 13 आणि काँग्रेसच्या 25 पैकी 8 उमेदवार कलंकित आहेत. याशिवाय या निवडणुकीतील 200 पैकी 24 अपक्ष उमेदवारांवर अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत.

केवळ 61 महिलांना उमेदवारी
संसद आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या गोष्टी करणार्‍या राजकीय पक्षांनी 53 जागांवर फक्त 61 महिलांना उमेदवारी दिली आहे, तर 619 पुरुष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बसपाने सर्वच्या सर्व 53 जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपचे 48 उमेदवार आहेत.