ऊर्जा संपन्न देशांसोबत भागिदारीही आवश्यक

0

नवी दिल्ली – येत्या पंचवीस वर्षांमध्ये भारतात संपूर्ण युरोपपेक्षा अधिक इंधन वापरले जाणार आहे. त्यामुळे ऊर्जेची गरज भागविण्यासाठी देशांतर्गत तेल व गॅस उत्पादन वाढविण्याची आवश्यक आहे. तसेच आपल्या क्षेत्रातील ऊर्जा संपन्न देशांसोबत भागिदारी वाढविणेही आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. तेल आणि गॅस क्षेत्रातील ‘पेट्रोटेक’ परिषदेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा ऊर्जा वापरकर्ता देश आहे. भारतातील इंधनाची मागणी सतत वाढतच राहणार आहे.

विदेशी कंपन्यांसोबत भागिदारी
2013 ते 2040 या काळात जगात ऊर्जेची जी मागणी वाढेल त्यात एक चतुर्थांश वाटा भारताचा असेल. 2040 मध्ये भारत युरोपपेक्षा जास्त तेलाचा वापर करेल. भारताची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी देशांतर्गत तेल व गॅस उत्पादन वाढविण्याची आवश्यक आहे. अधिकाधिक तेल उत्पादनासाठी भारतीय कंपन्या विदेशी कंपन्यांसोबत भागिदारी करतील, अशी मला अपेक्षा आहे. भारतीय ऊर्जा कंपन्यांनी आता बहुराष्ट्रीय कंपन्या बनून भारत-पश्चिम आशिया, भारत-मध्य आशिया आणि भारत दक्षिण आशिया असे ऊर्जा कॉरिडॉर बनवायला हवे. आर्थिक वृद्धीला गती देण्यासाठी ऊर्जा महत्त्त्वाची आहे. आर्थिक विकासाचा लाभ कनिष्ठ स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी सतत, स्थिर आणि वाजवी किमतीत ऊर्जा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी विश्वसनीय स्रोतांची गरज आहे. मात्र त्यावेळी पर्यावरणाकडेही लक्ष द्यावे लागेल.