अहमदनगर (देविदास आबूज) : ऊसाला 3100 रुपयांचा भाव देण्यासाठी शेतकरी संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे बुधवारी हिंसक वळण लागले. आंदोलक शेतकर्यांनी ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टर पेटवत रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको केला. तसेच, अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या वाहनावरही तुफान दगडफेक करून काचा फोडल्या. सुदैवाने या हल्ल्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुखरुप वाचले. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला अश्रुधुराचे नळकांडी डागली. तरीही जमाव आटोक्यात येत नाही हे पाहून गोळीबार करावा लागला. त्यात भगवान मापारी व बाबूराव दुकले हे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही शेतकरी पैठण येथील रहिवासी आहेत. दुसरीकडे पोलिसांनी गोळीबार केला नाही असा दावा, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला होता. पैठणमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या डागल्या. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांचे अटकसत्र सुरु होते. औरंगाबाद, नगरपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातही आंदोलक हिंसक झाले होते. मंगळवेढा रस्त्यावरील माचनूरजवळ झालेल्या रस्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांच्या लाठीमारात अनेक शेतकरी जखमी झाले होते. दरम्यान, ऊसदराचा प्रश्न मार्गी न लागल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तसेच, आंदोलक शेतकर्यांवरील हल्ला व गोळीबाराची न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. नगरमधील हिंसक आंदोलनाचे लोण पश्चिम महाराष्ट्रातील ऊसउत्पादक पट्ट्यातही पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.
शेतकरी आंदोलनात गोळीबार
ऊसदरासाठी आंदोलन करणार्या शेतकर्यांनी आक्रमक रूप धारण करण्यात सुरुवात केली आहे. बुधवारी अहमदनगरमध्ये आंदोलन पेटले. सरकारने ऊसदरात लक्ष घालावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव तालुक्यात बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकर्यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले असून, एक शेतकर्याला खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराचाही मारा केला.
संघटनेच्या नेत्यांची धरपकड
राज्य सरकारने शेतकरी आंदोलन मोडित काढण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तणावाची स्थिती निर्माण झाल्याने राज्य राखीव दलालाही पाचारण करण्यात आले होते. ऊस उत्पादक शेतकर्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन 3 हजार 100 रुपये एकरकमी भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्यावतीने शेवगाव तालुक्यातील घोटण येथे सोमवारपासून उसाने भरलेली वाहने अडविण्याचे आंदोलन सुरु होते. बुधवारी हे आंदोलन चिघळले. आंदोलकर्त्या शेतकर्यांनी जाळपोळीचे प्रकार केल्याने पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची धरपकड सुरु केली. आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांची गाडी फोडली. राज्य संघटनेचे प्रकाश बाळवडकर, अमरसिंह कदम, शेवगावचे दादासाहेब टाकळकर, संदीप मोटकर, शुभम सोनावळे, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, बाळासाहेब फटांगरे यांच्यासह दहा ते 15 शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शेवगाव तालुक्यात वातावरण तणावपूर्ण
पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने शेतकरी संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. पैठण-शेवगाव रस्त्यावर घोटण, खानापूर, कर्हेटाकळी, एरंडगाव, कुडगाव आदी ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. रस्त्यावर लाकडे आणि टायर जाळण्यात आले. आंदोलनाने उग्ररूप धारण केल्याने आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. खानापूर येथे अश्रुधुराचा मारा केला. पोलिसांच्या गोळीबारात भगवान मापारी (वय 34) व बाबुराव भानुदास दुकले (वय 45) हे दोन शेतकरी जखमी झाले असून, मापारी या जखमी शेतकर्यास शेवगाव येथे उपचारासाठी खासगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर शेवगाव तालुक्यात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी लाठीमार सुरूच ठेवल्याने आंदोलकांची पळापळ झाली. यानंतर राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले होते.