सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी प्रहार संघटनेकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या अंगावर रक्ताच्या बाटल्या फोडून निषेध व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच जनहित शेतकरी संघटनेने सहकारमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन केले होते. तेव्हापासून सुभाष देशमुख यांच्या निवास्थानाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडकारवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोरही आंदोलन करण्यात आले. बळीराजा शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले असून, ऊसाला योग्य दर जाहीर करेपर्यंत बळीराजा संघटना कारखान्यासमोर तळ ठोकणार आहे. त्यामुळे राज्यात आता ऊसदर आंदोलन पेटल्याचे दिसत आहे.