मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई : राज्यातील ऊस गाळप हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून, साखर संघ व विस्मा यांच्या सामाईक शिफारसींबाबत सर्वस्तरावर आढावा घेऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजन या संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची गाळप हंगाम 2018-19 बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा खासदार संजयकाका पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच साखर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा
साखर संघाच्या शिफारशी तसेच वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि राज्य सहकारी बँकेच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारचे धोरण व इतर संबंधित घटकांशी चर्चा करुन आढावा घेऊन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी राज्यातील साखर उद्योगासंदर्भात सविस्तर माहिती दिली. गतवर्षी संपूर्ण देशात 321.03 लाख टन साखर उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 107.10 लाख टन आहेत.
गाळप हंगाम 2018-19 साठी जाहीर एफआरपी दर हा 10 टक्के बेसिक साखर उताऱ्यासाठी प्रती क्विंटल 275 रुपये असून 10 टक्क्यांपुढे 0.1 टक्के उताऱ्यासाठी प्रती क्विंटल 2.75 रुपये आहे. तसेच 10 टक्क्यांपेक्षा कमी आणि 9.50 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा असेल तर 0.1 टक्क्यासाठी 2.75 रुपये प्रती क्विंटल व 9.50 किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास प्रती क्विंटल 261.25 रुपये केंद्र शासनाने 20 जुलै 2018 च्या अधिसूचनेनुसार जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे इसेंनशिअल कमोडिटीज् ॲक्ट 1955 अंतर्गत शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार साखर दर निश्चिती 2900 रुपये क्विंटल अशी केंद्र शासनाने ठेवली व साखरेवर जीएसटी 5 टक्के ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.