ऊस ट्रॉली उलटून महिला जखमी

0

पिंपरी-चिंचवड : चालकाचे नियंत्रण सुटून ऊस वाहून जाणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावर घडली. या घटनेत एक महिला जखमी झाली असून तिला पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. दरम्यान, जेसीबीच्या साह्याने उलटलेली ट्रॉली बाजूला करण्यात आली. सुमन कांबळे (वय 60 रा. आनंदनगर चिंचवड) असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना तेथील एक रिक्षा चालक गणेश वाघमारे यांनी तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले.

महिलेच्या डोळ्याला गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन चौकातून पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावरून उसनी भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन हा ट्रॅक्टर (एमएच14 डीजे 0183) निघाला होता. निरामय हॉस्पिटलजवळ चालकाचे नियंत्रण सुटून ऊस भरलेली ट्रॅक्टरची पहिली ट्रॉली उलटली. त्यावेळी तेथून जाणार्‍या सुमन कांबळे यांच्या अंगावर उसाचा ढीग पडल्याने त्या जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांना त्वरित बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कांबळे यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्या कानातूनही रक्त आले होते. त्यांच्यावर पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काहीकाळ वाहतूक ठप्प
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सुमन कांबळे यांनी माझ्यासोबत दोन मुले होती असे सांगितल्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उसाचा ढिगारा बाजूला करायला सुरुवात केली. पंधरा-वीस मिनिटांनी या ढिगार्‍याखाली कुणीच अडकले नसल्याचे समजताच सर्वानी सुटकेचा निश्‍वास टाकला. या अपघातामुळे तेथील एका छोट्या टेम्पोचेही नुकसान झाले. या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमल्यामुळे येथील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉली बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

ऊसाची पळवापळवी
घटनास्थळी बघ्याची गर्दी जमल्याने रस्त्यावरील ट्रॉली हटवणे, उसाचा ढीग बाजूला करणे कठीण जात होते. यावेळी काही नागरिक स्वतःहून पुढे सरसावले त्यांनी ऊस बाजूला करणे व वाहतूक सुरुळीत करणे अशी दोन्ही कामे केली तर काहींनी मात्र ऊस पळवून नेण्याची संधी साधली. तसेच काहींनी तर तिथेच ऊसाची चव चाखत बचाव कार्य पाहण्यास सुरुवात केली होती. माणुसकी आणि भावनाशून्यता या दोन्ही गोष्टींचे एकत्र दर्शन यावेळी पहायला मिळाले.

आणि सुस्कारा सोडला
दरम्यान, जखमी महिला माझी नात, माझी नात असे ओरडत ओरडत बेशुद्ध पडली. यामुळे लहान मुलगी ऊसाखाली अडकल्याच्या शक्यतेने लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. जवानांसह जमलेल्या गर्दीने ढिगारा उपसून शोधाशोध सुरू केली. मात्र ती सापडली नाही. दरम्यान, महिलेच्या घरचे लोक आल्यावर समजले नात शाळेतच असून तिला आणायला ही आजी घराबाहेर पडली होती. उलगडा झाल्याने सर्वांनी सुस्कारा सोडला.