अमळनेर। कृ षी मूल्य आयोगाचे नियम आणि आलेल्या मिळकतीच्या अनुषंगाने ऋण उत्पन्ननाचा दाखला द्यावा, अशी मागणी तालुक्यातील मंगरूळ येथील हिरालाल केशव पाटील यांनी करून शासनाला कोंडीत पकडले आहे. त्या अनुषंगाने दाखला द्या, अन्यथा आत्महत्येस लेखी परवानगी द्यावी, असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उपविभागीय अधिकार्यांनी उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी सक्षम अधिकारी, तहसीलदार असल्याने त्यांनी सर्व कागदपत्रे तपासून योग्य कार्यवाही करावी असे निर्देश दिली असल्याची माहिती तक्रारदारास सांगितले.
याबाबत त्यांनी 29 पानांचा पुरावाही सादर केला आहे. यापैकी कोणतीही माहिती खोटी निघाल्यास भांदवि प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील, अशी हमीपत्र देऊन गावरान जागल्या सेनेचे संघटक हिरालाल पाटील यांनी कागदपत्रांच्या आधारे त्यांना वजा म्हणजे ऋण एक लाख 96 हजार 667 रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला मिळावा, अशी विनंती नुकतीच निवेदनाद्वारे केली.
विद्यार्थ्यांचे हाल
विविध शैक्षणिक वर्गाचे निकाल जाहीर झाले असून पुढील वर्गात प्रवेशासाठी तसेच नवीन महाविद्यालयीन प्रवेशासाठी नॉन क्रिमेलिअर सोबत विविध दाखल्यांची आवश्यकता असते. सर्व दाखल्यांसाठी उत्पन्नाचे दाखल अनिवार्य आहे. मात्र उत्पन्नाचे दाखले वेळेवर भेटत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. अधिकार्यांकडून विद्यार्थ्यांची हेडसाळ होत आहे.
वजा उत्पन्नाचा दाखला मिळण्याची केली मागणी
हिरालाल पाटील यांच्याकडे मंगरूळ येथे सातबारा नोंदीप्रमाणे चार हेक्टर आणि 80 आर जमीन आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात 60 आर ज्वारी, 30 आर बाजरी, 1 हेक्टर 30 आर कपाशी 2 हेक्टरी 20 आर कोबी अशी लागवड केली होती. त्याबाबतच्या नोंदी 7/12वर आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या निश्चित केलेल्या दरानुसार लावणी, पेरणी केलेल्या शेती पिकांच्या विक्री केलेल्या उत्पन्नाचे आणि आयोगाने दर्शविलेल्या प्रति क्विंटल खर्चास अनुसरून निश्चित केलेले दर तसेच प्रति हेक्टरी अपेक्षित उत्पन्न या अनुषंगाने केलेले मूल्यांकन पाहून 2016-17 या वर्षात हिरालाल पाटील यांना एक लाख 96 हजार 667 एवढे वजा म्हणजे ऋण (निगेटिव्ह) उत्पन्न आले आहे.
कागदपत्राची पडताळणी करणार
2016-17 या वर्षात हिरालाल पाटील यांना एक लाख 96 हजार 667 एवढे वजा म्हणजे ऋण (निगेटिव्ह) उत्पन्न त्यानुसार दाखला मिळाला नाही तर राब राब राबून शेतीत तोटा येत असेल तर आपल्या स्तरावरून आत्महत्या करण्याची लेखी परवानगी मिळावी, अशी मागणी करून अधिकारी आणि शासनास चकित केले आहे. उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील आणि तलाठी याना निवेदन देण्यात आले आहे. यावर तहसीलदार प्रदीप पाटील म्हणाले की, वजा किंवा ऋण उत्पन्न दाखला देता येत नाही. मात्र दिलेल्या पुराव्यांची पडताळणी करणार.