ऋषभ पंतला यष्टिरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज

0

दिल्ली :भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात ४-१ अशा फरकाने कसोटी मालिका पराभूत झाला. या मालिकेत शेवटच्या ३ सामन्यांसाठी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली. पहिल्या दोन सामन्यात त्याला आपल्या फलंदाजीने फारशी छाप पाडता आली नाही. पण शेवटच्या सामन्यात त्याने शतकी खेळी करून आपल्या संघाला आधार दिला होता. याबाबत बोलताना निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंतला यष्टिरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य केले.

ऋषभ पंत हा युवा खेळाडू आहे. त्याच्या फलंदाजीने साऱ्यांना प्रभावित केले आहे. मात्र त्याला चांगले यष्टिरक्षण करण्याची गरज आहे. २० वर्षांच्या ऋषभ याने ओव्हल कसोटीत शानदार शतक केले. मात्र यष्टींच्या मागे त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे ऋषभला यष्टिरक्षणाचे धडे गिरवणे अधिक महत्वाचे आहे, असे प्रसाद म्हणाले.

ऋषभने इंग्लंडमध्ये शेवटच्या कसोटीत ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे मला आनंद झाला आहे. फलंदाज म्हणून तो उत्तम आहे. पण त्याच्या यष्टिरक्षणाबाबत मी थोडा चिंतीत आहे. त्याला यष्टिरक्षणाचे विशेष प्रशिक्षण देण्याचा आमचा विचार आहे. कारण ऋषभने दीर्घ काळासाठी भारताकडून यष्टिरक्षण करावे असे आम्हाला वाटते. त्याला आता तीन कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आता उत्तरोत्तर त्याने आपल्या यष्टिरक्षणासाठी परिश्रम घ्यावेत, असेही त्यांनी सुचवले.