एअरटेलने दिला ग्राहकांना दिलासा

0

दिल्ली: रिलायन्स जिओ नंतर अन्य कंपन्यांनी आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये ४० ते ४५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली होती. तसेच अन्य मोबाईल नेटवर्कसाठी फेअर युसेज पॉलिसी लागू करण्यात आली होती. परंतु आता एअरटेलनं ग्राहकांची वाढती नाराजी लक्षात घेता फेअर युसेज पॉलिसी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पुन्हा एकदा सर्वच मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याची घोषणा केली आहे.

एअरटेलने आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. आम्ही तुमचं म्हणणं ऐकलं आणि आम्ही एक बदल करत आहोत. शनिवार पासून भारतात कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉल करता येतील. यासाठी कोणतीही अट नाही, अशा आशयाचं ट्विट कंपनीने केलं आहे. एअरटेलने रिलायन्स जिओप्रमाणेच ठराविक कॉलची मर्यादा ओलांडल्यानंतर आययूसी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता कंपनीनं हा हे शुल्क न आकारण्याचा तसंच अमर्याद कॉल देण्याचा निर्णय घेतला आहे.

एअरटेलनं आपल्या प्लॅनमध्ये फेअर युसेज पॉलिसी लागू केल्यानंतर कंपनीच्या अनेक ग्राहकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच अनेक नेटकऱ्यांनी कंपनीच्या या निर्णयाचा विरोध केला होता. परंतु आता एअरटेलनं आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.