एअर इंडियाकडून खा. गायकवाडांचे तिकीट पुन्हा रद्द

0

नवी दिल्ली : एअर इंडियाने पुन्हा एकदा उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले. मागच्या आठवड्यात खा. गायकवाडांनी एअर इंडियाचे मॅनेजर आर. सुकूमार यांना चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे खा. गायकवाडांच्या देशातंर्गत विमान प्रवासावर बंदी आली आहे. खा. गायकवाडांनी आपल्या वर्तनाबद्दल माफी मागायला नकार दिला. मी का माफी मागू? असा उलटा प्रश्न त्यांनी केला. बिझनेस क्लासऐवजी इकोनॉमी क्लासमध्ये बसवल्याच्या रागातून खा. गायकवाडांनी सुकूमार यांना मारहाण केली होती.

माफी मागण्यास नकार!
संसदेतही शिवसेनेने खा. रवींद्र गायकवाड यांची बाजू लावून धरली आहे. विमानात गोंधळ घालणार्‍या कपिल शर्मावर कारवाई होत नाही मग खा. गायकवाडांवर कारवाई का? असा शिवसेनेचा प्रश्न आहे. दरम्यान, सरकारने रवींद्र गायकवाड यांचे वर्तन चुकीचे असल्याचे म्हटले आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. खासदार असे वर्तन करेल अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. कुठल्याही प्रकारचा हिंसाचार विमानासाठी आपत्ती असते असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू म्हणाले होते. अजूनही रविंद्र गायकवाडांना आपल्या वर्तनाबद्दल अजिबात खेद वाटत नसून, मंगळवारी सकाळी महाराष्ट्र सदनमध्ये बोलताना त्यांनी कसला पश्चाताप, मी माफी मागणार नाही, सुकुमार यांनी येऊन माफी मागावी, असे गायकवाड म्हणाले.