मुंबई । गतविजेत्या एअर इंडियाने आरसीएफ नाडकर्णी कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोमाने मुसंडी मारत युनियन बँक ऑफ इंडियाचा 2-1 असा पराभव करून जेतेपदावर नाव कोरले. चेंबूर येथील आरसीएफ कॉलनी ग्राउंडवर रंगलेल्या या सामन्यात युनियन बँकेने बलाढ्य एअर इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करत 66व्या मिनिटाला पहिल्या गोलची नोंद करत आघाडी घेतली होती. स्कॉट डिसूझा याने हा गोल करत बँकेला विजयासमीप आणून ठेवले होते. युनियन बँकेला तगडा बचाव करून विजेतेपद मिळवण्याची संधी असताना एअर इंडियाने मात्र प्रतिस्पर्ध्याच्या बचावाला सुरुंग लावला.
प्रतिस्पर्ध्यांवर सातत्याने दडपण आणतानाचा फायदा उठवत सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना एअर इंडियाने गोल करून बरोबरी साधली. प्रमोद पांडे याच्या गोलमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. अतिरिक्त वेळेत एअर इंडियासाठी दुसरा गोल करून रिनाल्डो फर्नांडिसने आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. या कामगिरीसह एअर इंडियाने सलग दुसर्या वर्षी जेतेपद पटकावण्याची करामत साधली. विजेत्या संघाला नाडकर्णी चषक आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.