मुंबई – ‘आयकॉनिक एअर इंडिया बिल्डिंगने शासनासोबतच रहावे,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सध्या एअर इंडियामध्ये आर्थिक आणीबाणीचा प्रसंग आहे. एअर इंडियाला कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागत आहे. एखाद्या खासगी व्यक्तीने आयकॉनिक एअर इंडियाला खरेदी केले, तर तो माझ्यासाठी दुःखाचा प्रसंग असेल, असे सांगून कंपनीने शासनासोबतच रहावे, असे आवाहन त्यांनी फेडरेशन ऑफ पीटीआय एम्प्लॉयीज संघटनेच्या कार्यक्रमात केले.
माध्यमांच्या अहवालानुसार एअरइंडियातील सध्याच्या आणीबाणीच्या प्रसंगामुळे सध्या मुंबईत असलेल्या एअर इंडिया बिल्डिंगमधील कंपनीच्या आर्टवर्क्सच्या विक्रीबाबत बोलणी सुरू आहेत. मागील महिन्यात नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे शासन संकटग्रस्त राष्ट्रीय वाहतुक सेवेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, शासन लवकरच एअर इंडियामधील समभागांची विक्री करण्याबाबतच्या कार्यक्रमाचे पुनरावलोकन करणार आहे. या वर्षी शासनाने ७६ टक्के समभागांची दिवाळखोरी घोषित करण्याचे योजले होते. मात्र, एअर इंडिया निर्गुंतवणुकीसाठी एकही बोली मिळविण्यात अपयशी ठरला.