भारत सरकारची अधिकृत विमान कंपनी एअर इंडिया सध्या तोट्यात आहे. त्यामुळे ही विमान कंपनी विकण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या कंपनीची हिस्सेदारी विकत घेण्यासाठी टाटा समूह पुढे आला आहे. एअर इंडियाला दरवर्षी हजारो कोटींचा तोटा होत असून सध्या कंपनीवर जवळपास 35 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे सरकारी विमानसेवा पोसणे म्हणजे पांढरा हत्ती होऊन बसले आहे. याविषयी नीती आयोगाने तयार केलेल्या अहवाल ही विमानसेवा बंद करणे किंवा ती खासगी विमान कंपन्यांना विकणे असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. या पाश्वर्र्भूमीवर सरकारतर्फे एअर इंडिया विकण्याविषयी हालचाली सुरू केल्या आहेत. कंपनी पूर्णपणे खासगी हातात देण्यास नागरी हवाई वाहतूक खात्याची पूर्ण सहमती अद्याप मिळालेली नाही. विशेष म्हणजे भारतात विमान सेवा सुरू करण्याचा मान टाटा समूहाकडेच आहे. जेआरडी टाटा यांनी सुरू केलेली विमानसेवाच पुढे सरकारने ताब्यात घेऊन तिचे सरकारी विमानसेवेत रुपांतर केले होते.