नवी दिल्ली । शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी विमानात घातलेल्या गोंधळानंतर एअर इंडियाने आता बेशिस्त प्रवाशांचे ‘पंख’ छाटण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आता अशा दंगेखोर प्रवाशांना ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात येईल. या यादीतील प्रवाशांना बंदीच्या कालावधीत एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करता येणार नाही.
तीन प्रकारांमध्ये या शिक्षेची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या प्रकारात आक्षेपार्ह हावभाव, दुसर्या प्रकारात ढकलणे, मारणे किंवा लैंगिक छळ यासारखी कृती तर तिसर्या प्रकारात जीवे मारण्याचा प्रयत्न यावरून शिक्षा निश्चित केली जाईल. त्यानुसार संबंधित प्रवाशांवर अनुक्रमे तीन महिने, सहा महिने आणि दोन वर्षांसाठी निर्बंध घालण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून शुक्रवारी या नव्या नियमांची घोषणा करण्यात आली. बेशिस्त आणि कामकाजात अडथळे निर्माण करणार्या प्रवाशांना जरब बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.