एआयडीएमकेतील शशिकलापर्व संपले!

0

व्ही. के. शशिकलासह भाचा दिनकरनचीही हकालपट्टी

चेन्नई : ऑल इंडिया अन्ना द्रमुक पक्षाचा ताबा घेऊ पाहणार्‍या पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांच्यासह त्यांचे भाचे व पक्षाचे सहसचिव टीटीव्ही दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षातर्फे मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे स्व. जयललिता यांच्यानंतर पक्षाची सूत्रे हाती ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या शशिकला यांना मोठा झटका बसला आहे. या हकालपट्टीनंतर पक्षातून शशिकलापर्व आता संपुष्टात आले आहे. नऊ महिन्यांच्या राजकीय संघर्षानंतर एकत्र आलेल्या दोन्ही गटाने हा बहुमताने निर्णय घेतला. शशिकला या सद्या तुरुंगात आहेत.

शशिकलांच्या कुटुंबीयांना हाकलले
एआयडीएमकेच्या सर्वोच्च समितीची बैठक मंगळवारी चेन्नईत पार पडली. या बैठकीत शशिकला यांची पक्षाच्या महासचिवपदी झालेली निवड तसेच टीटीव्ही दिनकरन यांची सहसचिवपदी झालेली निवड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या दोघांनाही पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री के. पलानीसामी व उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी संयुक्तपणे हा निर्णय जाहीर केला. या दोन्ही गटाने यावेळी सर्वसहमतीने स्व. जयललिता यांनाच पक्षाचे कायमचे सरचिटणीस म्हणून जाहीर केले. पक्षातून व्ही. के. शशिकला व त्यांच्या कुटुंबीयांच्या हकालपट्टीचा निर्णय यावेळी बहुमताने घेण्यात आला. डिसेंबरमध्ये जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना ओ. पन्नीरसेल्वम यांनी कडाडून विरोध केला होता. के. पलानीसामी यांना मुख्यमंत्री नेमण्याचा निर्णयही शशिकला यांच्याच पायावर धोंडा पाडणारा ठरला आहे.