एककेंद्री कारभारामुळे विकासाला खीळ

0

बारामती (वसंत घुले) । बारामती नगरपालिकचे नगरसेवक हे केवळ नामधारी असल्याचे चित्र दरमहाच्या मासिक सभेत दिसते. नगरसेवक नगरपरिषदेत ठेकेदारांची लॉबी कार्यरत आहे, असे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नुकत्याच झालेल्या मासिक सभेत संजय संघवी यांनी पथदिव्यांचा विषय काढला. परंतु मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयत्न असल्याचे चर्चीले गेले. नगरपालिकेचा कारभार खर्‍या अर्थाने कोण चालविते हे तमाम बारामतीकरांना माहीत आहे. नगरपालिकेच्या कोणत्याही बांधकामात किंवा कामात प्रशासनाचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो मात्र प्रशासनावर दबाव कसा असतो? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रशासन चांगले काम करू लागले की प्रशासनालाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो.

नगरपालिकेच्या कारभाराविरोधात सातत्याने उपोषणे का केली जातात? याचे पहिले उत्तर पदाधिकार्‍यांनी शोधले पाहिजे. विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे अडवून धरायची त्यासाठी प्रशासनाचा बळी द्यायचा आणि पुन्हा सांगायचे आम्ही समाजकारण करीत आहोत. हा थोतांडपणा कुठेतरी थांबविण्याची गरज आहे. बहुमताच्या जोरावर चुकीची कामे करायची आणि यात प्रशासनाला बदनाम करायचे ही भूमिका बारामतीच्या विकासास पोषक नाही. गेल्या अनेक वर्षाचा कारभार पाहता यात कोठेही सुधारणा होताना दिसत नाही. नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येणार्‍या अनेक कामात ठेकेदार साखळी करीत असून अनेकदा नवीन ठेकेदारांना निविदा भरण्यापासूनच रोखले जात असल्याचा आरोप केला जात आहे. नगरपालिकेत ठेकेदारांची मोठी लॉबी कार्यरत असल्याचा आरोप म्हणजे हास्यास्पद आहे. याचाच अर्थ असा की, गैरकामे झाकण्याचा हा उत्तम मार्ग नगरसेवकांनी निवडल्याचे मानले जात आहे. नगरसेवकांनी कामाच्या ठिकाणी भेटी देऊन त्यातील त्रुटी शोधून कामाचा दर्जा तपासून प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे. इथे मात्र उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. विशेष म्हणजे सत्ताधार्‍यांनीच अशा प्रकारचा आरेाप करणे चूकीचे असून यातूनही आपले अकर्तृत्व व निष्क्रियत्व सिध्द करावे यासारखी दुर्दैवी कोणतीही गोष्ट नाही.

नगपालिकेच्या सत्ताधारी गटातच सरळसरळ दुफळी पडल्याचे हे लक्षण मानले जात आहे. पण याची जाहीर कबुली प्रशासनाच्या माथी मारून द्यायची व प्रशासनाला बदनाम करायचे आणि आपण नामानिराळे रहायचे. यामुळे शहराचा विकास नव्हे तर भकास होण्याची चिन्हे आहेत. याकडे एक जबाबदार नागरीक म्हणून नागरीकांनीही लक्ष घातले पाहिजे. नगरपालिकेचा कारभार एककेंद्री पद्धतीने चालतो असे सर्वांनाच माहित आहे. दुर्दैवाचा भाग असा की, बारामती नगरपालिकेने बनविलेली ड्रेनेजस्किम ही अत्यंत निकृष्ठ दर्जाची असून त्याची चौकशी व्हावी अशीही मागणी होत आहे. कारण ड्रेनेजस्किम ही प्लॅनपेक्षा वेगळी बनविली असून दुय्यम दर्जाची आहे. तसेच त्याचे अनेक धोके भविष्यात आहेत. याकडे लक्ष देण्याऐवजी ठेकेदार आणि प्रशासन यांच्या माथ्यावर हे सगळ खापर फोडायचे, असा हा प्रकार आहे. शहरात गतीरोधक बनविलेले आहेत. यातील 99 टक्के गतीरोधक हे नियमबाह्य असून कोणताही दर्जा नाही. तसेच गतीरोधक विषयक नियमांना बगल देऊन थोडेसे उंच कठडे बांधलेले आहेत. प्रशासनाने गतिरोधक बनवणार्‍या ठेकेदाराचे बिल अडविले असता सदरचे बिल देण्यासाठी काही नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव टाकला होता. एकाला झाकायचे आणि दुसर्‍याला उघडायचे असा प्रकार बारामती नगरपरिषदेत वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यामुळे नागरीकांच्या हालात भरच पडत आहे.