‘एकच नारा, कायम करा’ची संघटनेची आग्रही मागणी

0

धुळे । वेळोवेळी आंदोलने करुन, शासनाला निवेदने देवून काहीही उपयोग होत नसल्याचे बघून एनएचएम अधिकारी व कर्मचारी महासंघाने बेमुदत बंदचे अस्त्र उगारले आहे. संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर धरणे आंदोलन करण्यात आले. ‘एकच नारा, कायम करा’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरुच राहणार आहे.

भाजपा सरकारला आश्‍वसनाचा विसर
यासंदर्भात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ, धुळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आपले म्हणणे विस्तृत मांडले आहे. त्यात म्हटले आहे की, भाजपा विरोधी पक्षात असतांना त्यांच्याच पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात संघटनेने 12 डिसेंबर 2012 रोजी नागपूरात आंदोलन केले होते.तसेच भाजपा सत्तेत आल्यास एनएचएम कर्मचार्‍यांना कायम करण्यात येईल, असे त्यांनी आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यांना आश्‍वसनांचा विसर पडला. उलट भाजपा सरकार आल्यानंतर कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच नाहीत उलट 8 टक्के वेतन वाढ 5 टक्क्यांवर आली. पूर्वी पेक्षा जाचक अटी लादण्यात आल्या. राज्य आरोग्य सोसायटीकडून प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदे कमी करण्यात आली. कर्मचारी सेवेत कायम करण्यात मागणी करीत असतांना सरकार मात्र कंत्राटी नोकर्‍यांवर देखील गदा आणू पहात असल्यानक 11 एप्रिलपासून राज्यस्तरीय कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.