मुंबई । वर्ष 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची संयुक्त रणनीती ठरवण्याच्या उद्देशाने मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पडली. या बैठकीत काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे उपस्थित राहीले, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील या बैठकीत सहभागी होते.
आगामी विधीमंडळ अधिवेशनात सरकारला घेरण्यावर दोघांमध्ये एकमत झाले आहे. भविष्यात एकत्र काम करण्याबद्दल चर्चा झाली, तर काही मुद्यांवर वरिष्ठ पातळीवर अर्थात सोनिया गांधी – शरद पवार यांच्यात चर्चा होईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली रणनीती, लोकसभा पोटनिवडणूक, विधान परिषदेची निवडणूक, सरकारविरोधात संयुक्त आंदोलन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. त्याचबरोबर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याबाबतही प्राथमिक चर्चा या बैठकीच्या निमित्ताने पार पडली. आजच्या बैठकीत विद्यमान राजकीय स्थिती, आगामी निवडणुका आणि अधिवेशनात सरकारविरोधात एकजुटीने उभे राहण्याबाबत चर्चा करण्यात आली. मतांची विभागणी होऊ नये यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे सुनील तटकरे यांनी नमूद केले.