मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ८० तासात कोसळल्यानंतर आज मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेत आहे. काल बुधवारी माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. आम्हाला दूर केले म्हणून भाजपवर आज ही वेळ आली आहे अशी टीका खडसे यांनी केली होती. त्यानंतर आज गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथराव खडसे हे आमच्या संपर्कात नेहमीच होते असे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे नवीन राजकीय चर्चेला उत आले आहे.
एकनाथराव खडसे हे भाजपात नाराज असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. भाजपने यावेळी त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यानंतर त्यांची नाराजी अधिकच वाढली. ही नाराजी त्यांनी व्यक्त देखील केली आहे. काल त्यांनी भाजपने आम्हाला दूर केले नसते तर आज ही वेळ आली नसती असे विधान केले होते. एकनाथराव खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा देखील काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र याबाबत अद्याप त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता संजय राऊत यांनी हे विधान केल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.