प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ; भुसावळात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक ; खडसेंना मंत्री मंडळात घेण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रश्नांची सरबत्ती
भुसावळ- एकनाथराव खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून आगामी मंत्री मंडळ विस्तारात त्यांच्याबाबत निश्चित सकारात्मक विचार होणार असून गत 15 दिवसांपासून राज्यभर दौरे सुरू असून आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बैठकी घेण्यात येत असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. खडसे यांच्या मंत्री मंडळ प्रवेशाबाबत त्यांनी ठोस काही सांगण्याऐवजी खडसे यांच्या न्यायालयीन चौकशी सुरू असल्याचे सांगत वेळ मारून नेली. रावेर लोकसभा संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शहरातील शांतीनगर भागातील आयएमए हॉलमध्ये शनिवार, 10 रोजी झाली. सकाळी 10 वाजता सुरू होणारी बैठक तब्बल दोन तास उशिराने झाली शिवाय प्रसिद्धी माध्यमांना आमंत्रण देवूनही ऐनवेळी मात्र प्रवेश नाकारण्यात आला.
प्रदेशाध्यक्षांना संतप्त कार्यकर्त्यांनी विचारला जाब
नाथाभाऊ भाजपाचे ज्येष्ठ नेते असूनही त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांचा मंत्री मंडळात प्रवेश कधी होणार? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांना उपस्थित केला. सुमारे अर्धा तासापर्यंत कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले. जनता आम्हाला याबाबत विचारणा करीत आहे. आम्ही काय उत्तर द्यायचे? आमची कोणतीही कामे होत नसून हा नाथाभाऊंवर व आमच्यावर अन्याय असून मंत्रीमंडळात त्यांच्या समावेशाबद्दल अजूनही का वाट पाहिली जात आहे? यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर रावेर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यावर ठोस काहीही न सांगता आगामी काळात विचार करण्यात येईल असे सांगून प्रदेशाध्यक्षांनी फक्त वेळ मारुन नेली. दानवे यांनी कार्यकर्त्यांचा समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही कार्यकर्ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. बंदिस्त सभागृहात चर्चा झाली तर दानवे यांनी र्चा बाहेर न जाण्यासाठी सभागृहाच्या खिडक्या बंद करण्याच्या सूचनाही केल्या.
दोषी की निर्दोष सांगा -नाथाभाऊ
आमदार खडसे म्हणाले की, गत 40 वर्षाच्या कारकिर्दीत कोणतेही आरोप माझ्यावर झालेले नाहीत परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरुन माझ्यावर आरोप झाले व त्यामुळे माझ्यावर अन्याय करण्यात आला. नाथाभाऊ दोषी आहेत की, निर्दोष एवढेच महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्यावे, अशी भावना त्यांनी खडसे यांनी व्यक्त केली. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची अनुपस्थिती असल्याने बैठकीत चर्चेचा विषय झाला होता. प्रदेश संघटक विजय पुराणिक यांनी ही बैठक फक्त भाजपा पदाधिकारी व कार्यकत्र्यांची असून पत्रकारांना बसता येणार नाही, असे सांगितल्याने पत्रकारांना काढता पाय घ्यावा लागला.
यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश संघटक सचिव विजय पुराणिक, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हासंघटक प्रा.सुनील नेवे आदी उपस्थित होते. बैठकीस मंडळाध्यक्षांना मंडळाची व पदाधिकारी रचना, प्रशिक्षण वर्ग, सीएम चषक स्पर्धेबाबत आढावा आदी विषयांवर विचारमंथन करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती.