एकनाथराव खडसे यांची नाराजी लवकरच दूर होणार!

0
नवी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
मुंबई : गेले कित्येक महिन्यांपासून राज्यात भाजपाला सत्तेवर आणण्यात महत्वाचा वाटा असणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे सरकारमधून बाहेर आहेत. त्यांच्या वापसीविषयी बरेच तर्कवितर्क लढविले जात असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत महत्वपूर्ण बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. बैठकीत नेमके काय झाले हे समजले नसले तरी आक्रमक होत चाललेल्या विरोधी पक्षांना आव्हान देण्यासाठी खडसे यांची लवकरच नाराजी दूर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी जमीन प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते खडसे यांनी आपल्या वाढदिवसादिवशी झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वपक्षाला आव्हान देत राज्यभर “एल्गार यात्रा” काढण्याची घोषणा केली होती. गेली दीड वर्षांपासून अधिक काळ मंत्रिमंडळाच्या बाहेर असलेले खडसे यांची नाराजी पक्षाला जड जावू शकते, सोबतच सर्व विरोधी पक्षांनी एकीची मूठ आवळली आहे. याची कल्पना दिल्लीतील नेत्यांना आल्याने आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवी दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने खडसे दिल्लीत असून, सोमवारी सायंकाळी खडसे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात बैठक झाली. या बैठकीत नाराज असलेल्या खडसेंची नाराजी दूर करण्यात आल्याचे समजते. तर; आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.